पाटणा : शिवम दुबेने (४१ धावा आणि ६ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बिहारचा एक डाव आणि ५१ धावांनी फडशा पाडून विजयी सलामी नोंदवली.
पाटणा येथील मोईन उल हक स्टेडियममध्ये झालेल्या ब-गटातील या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात २५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बिहारचा पहिला डाव १०० धावांत आटोपल्यावर मुंबईने फॉलोऑन लादला. मात्र दुबेने चार, तर रॉयस्टन डायसने हॅट्ट्रिकसह तीन बळी पटकावल्याने बिहारचा दुसरा डावसुद्धा सोमवारी ३५.१ षटकांत १०० धावांतच आटोपला. शर्मन निगरोधने त्यांच्यासाठी सर्वाधिक ४० धावा केल्या. मुंबईला डावाने विजय मिळवल्याने बोनस गुणासह एकूण ७ गुण मिळाले. आता त्यांची १२ जानेवारीपासून आंध्र प्रदेशशी गाठ पडेल.
विदर्भाच्या विजयात आदित्य ठाकरे चमकला
मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरेने (४४ धावांत ४ बळी) दुसऱ्या डावातही केलेल्या प्रभावी माऱ्याच्या बळावर विदर्भाने अ-गटातील सामन्यात सेनादलचा ७ गडी राखून पराभव केला. सेनादलचा दुसरा डाव १५५ धावांत गुंडाळल्यावर विदर्भाने १७८ धावांचे लक्ष्य ५६.३ षटकांत गाठले. संजय रघुनाथने ९ चौकारांसह नाबाद ८४, तर करुण नायरने ३६ धावांचे योगदान दिले. तसेच महाराष्ट्राने पहिल्या सामन्यात मणिपूरचा एक डाव व ६९ धावांनी धुव्वा उडवला.