मुंबई : शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंच्या मदतीसाठी सदैव पाठीशी उभे राहणारे शरीरसौष्ठव संघटक प्रशांत आपटे यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शरीरसौष्ठव क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर बदलापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शरीरसौष्ठव खेळावरील प्रेमापोटी ११ वर्षांपूर्वी आपटे संघटनेत दाखल झाले. प्रारंभी ते ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी बदलापूरला आरोग्य साधना हेल्थ सेंटर नावाची अद्ययावत जिमसुद्धा सुरू केली. गेले दीड दशक ते बदलापूरात रोटरी ठाणे श्री स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करत आहेत.