भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक

यशस्वी जयस्वालच्या नाबाद ९० धावा आणि केएल राहुलचे नाबाद अर्धशतक या बिनबाद १७२ धावांच्या सलामीमुळे बॉर्डर- गावस्कर मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. कर्णधार जसप्रीत बुमराने ५ विकेट मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १०४ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २१८ धावांची मोठी आघाडी आहे.
भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक
Published on

पर्थ : यशस्वी जयस्वालच्या नाबाद ९० धावा आणि केएल राहुलचे नाबाद अर्धशतक या बिनबाद १७२ धावांच्या सलामीमुळे बॉर्डर- गावस्कर मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. कर्णधार जसप्रीत बुमराने ५ विकेट मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १०४ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २१८ धावांची मोठी आघाडी आहे.

कर्णधार जसप्रीत बुमराने ११व्यांदा ५ विकेट घेण्याची कामगिरी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाची अवघ्या १०४ धावांवर भंबेरी उडाली. त्यानंतर पहिल्या सामन्यात अपयशी सुरुवात केलेल्या भारतीय सलामीवीरांनी दुसऱ्या डावात मात्र सावध सलामी दिली. युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने १९३ चेंडूंत नाबाद ९० धावा जमवल्या आहेत. अनुभवी के. एल. राहुलने १५४ चेंडूंचा सामना करत ६२ धावांची भर घातली. या दोघांनीही अगदी संयमी फलंदाजी केली. कमजोर चेंडूंची वाट पाहत त्यांनी फटक्यांची निवड केली.

भारताने चहापानापर्यंत ३१ षटकांत ८८ धावांची भर घातली. भारताच्या या सलामीच्या जोडीने विचारपूर्वक फलंदाजी केली. कमजोर चेंडूची वाट पाहून या सलामीच्या दुकलीने फटके मारले. यशस्वी जयस्वालने १९३ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद ९० धावा केल्या. के. एल. राहुलने १५३ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावांची भर घातली.

राहुलने ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाला अप्रतिम तोंड दिले. दुसऱ्या दुपारपर्यंत खेळपट्टीत बदल झाला. खेळपट्टीवरचा ओलावा कमी झाला होता. चेंडू सीम होण्यालाही मर्यादा आल्या. त्यामुळे फलंदाजी करणे तुलनेने अधिक सोपे झाले. त्याचा फायदा भारतीय फलंदाजांनी उठवला.

आपण पहिल्या डावातून धडा घेतला असल्याचे जैस्वालने आपल्या खेळीतून दाखवून दिले. त्याने अचूक फटक्यांची निवड केली. शिवाय चांगल्या चेंडूचा सन्मान केला. त्याने आपल्या नाबाद अर्धशतकीय खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले.

सेट झाल्यानंतर जैस्वालला गोलंदाजी करणे ऑस्ट्रेलियासाठी कठीण झाले. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी आखूड किंवा फुल लेन्थचे चेंडू फेकले. परंतु त्याचा जैस्वालने चांगला प्रतिकार केला.

पॅट कमिन्सच्या चेंडूवर राहुलने एक अप्रतिम बॅक ड्राईव्ह मारला. जैस्वालनेही नजरेत साठवून ठेवावे असे फटके मारले. जैस्वालने मिशेल स्टार्कला कव्हर्सला एक शानदार फटका मारला.

चहापानानंतरच्या सत्रात फिरकीपटू नॅथन लिऑनने भारताच्या धावांना बऱ्यापैकी ब्रेक लावला. परंतु विकेट मिळविण्यात तो अपयशी ठरला. यावेळी जैस्वाल किंवा राहुल दोघांचाही संयम सुटला नाही. जैस्वालचे अर्धशतक १२३ चेंडूत झाले. गेल्या १५ कसोटी सामन्यांमधले त्याचे हे सर्वात संथ शतक ठरले.

शनिवारी सकाळच्या सत्रात बुमराने ११व्यांदा ५ बळी मिळवण्याची कामगिरी केली. हर्षित राणाने बुमराला छान साथ दिली. राणाने सेट झालेल्या स्टार्कला आपल्या जाळ्यात अडकवले.

खेळपट्टीचा विचार करता ३०० धावांवरील लक्ष्य या खेळपट्टीवर मोठे लक्ष्य ठरेल. त्यामुळे दुसऱ्या दिवसाअखेर भारताचे पारडे जड आहे.

तत्पूर्वी भारताचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला होता. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ४१ धावा जमवल्या होत्या. तर रिषभ पंतने ३७ धावांची जोड दिली होती. भारताच्या अन्य फलंदाजांनी पहिल्या डावात निराश केले होते. मात्र शानदार गोलंदाजी करत भारताने सामन्यात पुनरागमन केले. कर्णधार जसप्रीत बुमरा, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजी त्रिकुटाने ऑस्ट्रेलियाला उद्ध्वस्त केले.

यशस्वी-राहुल यांची विक्रमी सलामी

पहिल्या डावातील निराशाजनक फलंदाजीनंतर दुसऱ्या डावात मात्र भारताच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि अनुभवी केएल राहुल या दुकलीने दुसऱ्या दिवसअखेर नाबाद १७२ धावा केल्या. गेल्या २० वर्षांत भारतीय सलामीच्या जोडीने कसोटीत केलेली ही सर्वाधिक धावांची सलामी आहे.

बुम बुम बुमरा..!

भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमरा ऑस्ट्रेलियासाठी कर्दनकाळ ठरला. बुमराने १८ षटकांत ३० धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ५ फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवला. त्यात ६ निर्धाव षटकांचा समावेश होता. बुमराने स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करत ऑसींच्या फलंदाजांना जेरीस आणले. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला अवघ्या १०४ धावांत सर्वबाद करण्यात भारताला यश आले. बुमराला हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज यांनी छान साथ दिली. कसोटी पदार्पणवीर हर्षितने १५.२ षटकांत ३८ धावा देत ३ विकेट मिळवल्या.

शेवटच्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी

स्टार्कने ११२ चेंडूंत २६ धावा करत भारतीय गोलंदाजांना सतवले होते. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांवर संपुष्टात आला. प्रमुख फलंदाज झटपट बाद झाले असले तरी त्यांच्या तळातील फलंदाजांनी तुलनेने चांगली फलंदाजी केली. स्टार्कने (११३ चेंडूत २६ धावा) आणि हेझलवूडने (३१ चेंडूत नाबाद ७ धावा) १८ षटकांत शेवटच्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

भारत : पहिला डाव १५० धावा आणि दुसरा डाव ५७ षटकांत नाबाद १७२ धावा (यशस्वी जयस्वाल नाबाद ९० धावा, के. एल. राहुल नाबाद ६२ धावा); जोश हेझलवूड ०/९

ऑस्ट्रेलिया : १०४ धावांवर सर्वबाद (ॲलेक्स केरी २१ धावा, मिचेल स्टार्क २६ धावा; जसप्रीत बुमरा ५/३०, हर्षित राणा ३/४८, मोहम्मद सिराज २/२०)

logo
marathi.freepressjournal.in