नवी दिल्ली / पर्थ : बॉर्डर गावस्कर मालिकेआधी भारतीय संघाच्या चिंतेत दिवसागणिक वाढ होत आहे. सर्फराज, केएल राहुल यांच्यापाठोपाठ संघाचा युवा फलंदाज शुभमन गिलच्या डाव्या अंगठ्याला शनिवारी दुखापत झाली. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
गिल हा भारताचा युवा फलंदाज असून त्याने गेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेत भारताकडून चमकदार कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या सहभागाबाबतही साशंकता आहे. त्यासोबत गिलही संघाबाहेर पडल्यास भारताला त्याचा मोठा फटका बसू शकतो. भारतीय संघातील खेळाडूंची विभागणी करून झालेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी क्षेत्ररक्षण करताना गिलच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याला जास्त त्रास होत होता. त्यामुळे तातडीने मैदान सोडत तो स्कॅन करायला गेला.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिलच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याला आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या सामन्यापूर्वी गिलचे दुखापतीतून सावरणे कठीण वाटत आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. अंगठ्याचे फ्रॅक्चर बरे होण्यासाठी साधारणपणे १४ दिवस लागतात. त्यानंतर एखादा खेळाडू सराव सत्राला सुरुवात करतो. त्यामुळे त्याचे फ्रॅक्चर एवढ्या लवकर काढणे अशक्य आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा अॅडलेड येथे ६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्या सामन्यापर्यंत गिल दुखापतीतून सावरण्याची शक्यता आहे.
गिलची अनुपस्थिती ही भारतीय संघासाठी मोठी चिंताजनक बाब असू शकते. कारण तो केवळ तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नाही, तर रोहितच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वालसोबत तो सलामीला फलंदाजी करू शकतो. त्याआधी शुक्रवारीही भारताला दुखापतीचा फटका बसला. संघांतर्गत सामन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी प्रसिद्ध कृष्णाच्या शॉर्ट बॉलमुळे यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलच्या कोपराला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्यावर व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे.
अभिमन्यू ईश्वरनला कसोटी पदार्पणाची संधी?
दुखापतीमुळे शुभमन गिल पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. जर गिल अनुपस्थित असेल तर, अभिमन्यू ईश्वरनला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. कारण त्याच्या व्यतिरिक्त भारताकडे फारसे पर्याय शिल्लक नाहीत. कर्णधार रोहित शर्मा संघात सहभागी झाल्यास या जागेचा तिढा सुटू शकतो.
शमी दुसऱ्या कसोटीपूर्वी संघात?
रणजी ट्रॉफीमध्ये ७ बळी मिळवणारा आणि ३७ धावा करणारा मोहम्मद शमी दुसऱ्या कसोटीपूर्वी संघात सामील होण्याची शक्यता आहे. दरम्यान शुक्रवार २२ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमधील ऑप्टस स्टेडियममध्ये मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसून सराव करत आहे. परंतु खेळाडूंची दुखापत संघासाठी चिंतेची बाब आहे. प्रमुख खेळाडूंना होत असलेली दुखापत संघाच्या चिंतेत भर घालत आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत उसळी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे.