अश्विन-शार्दूल दोघांनाही अंतिम संघात खेळवावे!

भारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचे मत
अश्विन-शार्दूल दोघांनाही अंतिम संघात खेळवावे!

ऋषिकेश बामणे/मुंबई

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारपासून रंगणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत भारताने रविचंद्रन अश्विन आणि शार्दूल ठाकूर या दोघांनाही अंतिम ११ खेळाडूंत स्थान द्यावे, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारपासून ओव्हल येथे अंतिम सामना खेळवण्यात येणार असून, या लढतीसाठी भारतीय संघ कोणत्या रणनीतीसह मैदानात उतरणार, याविषयी अद्याप संभ्रम कायम आहे. काहीजण अश्विन-रवींद्र जडेजा या दोन्ही फिरकीपटूंना खेळवण्याचे सल्ले देत आहेत, तर काही अश्विनला वगळून इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांचा विचार करता मोहम्मद सिराज व मोहम्मद शमीच्या साथीने शार्दूलला वेगवान गोलंदाज म्हणून खेळवावे, असे सुचवत आहेत. ६१ वर्षीय राजपूत यांनी मात्र दोघांनाही अंतिम संघात खेळवण्याचे सुचवले आहे.

“मी जर भारताचा कर्णधार असतो, तर अश्विन आणि शार्दूल या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली असती. याचे मुख्य कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संघात किमान तीन-चार डावखुरे फलंदाज असतील. त्यांच्याविरुद्ध अश्विन नक्कीच प्रभावी ठरेल. दुसरे म्हणजे शार्दूलने इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर नेहमी चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्याच्या समावेशामुळे फलंदाजी अधिक लांबेल. त्यामुळे सिराज, शमी, शार्दूल हे तीन वेगवान, तर अश्विन-जडेजा हे दोन फिरकीपटू असे माझे गोलंदाजीचे पंचक असेल,” असे राजपूत म्हणाले.

रहाणेचे योगदान मोलाचे; ऑस्ट्रेलिया अधिक तयार

सध्याचे चित्र पाहता के. एस. भरतच यष्टिरक्षक म्हणून खेळेल, असे वाटत असल्याचे राजपूत यांनी सांगितले. तसेच चेतेश्वर पुजाराच्या तुलनेत मुंबईकर अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर कसे योगदान देतो, हे भारताच्या दृष्टीने मोलाचे ठरेल, असे ते म्हणाले. ऑस्ट्रेलियाच्या संघातील बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये नव्हते. त्यामुळे ते या अंतिम फेरीसाठी अधिक चांगल्याप्रकारे तयार झाले असतील, मात्र भारताचे खेळाडू नक्कीच त्यांना कडवी झुंज देतील, यात शंका नसल्याचे राजपूत यांनी नमूद केले. शुभमन गिल व विराट कोहली यांना इंग्लंडच्या खेळपट्टीवर कसोटीत एकत्रित फलंदाजी करताना पाहण्यासाठी आतुर असल्याचेही राजपूत यांनी अखेरीस म्हटले.

राजपूत यांची प्लेइंग इलेव्हन

१) रोहित शर्मा

२) शुभमन गिल

३) चेतेश्वर पुजारा

४) विराट कोहली

५) अजिंक्य रहाणे

६) के. एस. भरत

७) रवींद्र जडेजा

८) रविचंद्रन अश्विन

९) शार्दूल ठाकूर

१०) मोहम्मद शमी

११) मोहम्मद सिराज

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in