उसळी आणि गती

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेऐवजी सरसकट सहा सामन्यांची टी-२० मालिका आयोजित करणेच अधिक सयुक्तिक ठरले असते
उसळी आणि गती

बहुप्रतिक्षित टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा संघ कोट्यवधी भारतीयांच्या मोठ्या अपेक्षा घेऊन ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. या संघातील खेळाडूंच्या निवडीबाबत मतमतांतरे असली, तरी आता याबाबत फारशी मीमांसा करण्याऐवजी संबंधितांनी उपलब्ध खेळाडूंचा प्रभावीपणे वापर करून घेण्याची रणनीती आखण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. नियोजन चुकले, असे वाटत असले; तरी आता सारवासारव करून उपयोग नाही, खचितच.

मुळात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेऐवजी सरसकट सहा सामन्यांची टी-२० मालिका आयोजित करणेच अधिक सयुक्तिक ठरले असते. त्यामुळे टी-२० विश्वचषकाच्या संघातील खेळाडूंना आवश्यक तो सराव आपसुकच मिळू शकला असता. या सामन्यात खेळाडूंकडून विशिष्ट विक्रम घडून आला असता; तर त्यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला असता. सराव सामन्यात झळकविलेले शतक किंवा घेतलेले विकेट्स यांची विक्रमात नोंद होत नसते. त्यामुळे अधिकृत सामने खेळले गेले असते तर तगड्या संघासोबत खेळण्याचा सरावही झाला असता आणि संभाव्य विक्रमाचा इतिहासही लिहिला गेला असता, कदाचित.

आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी तेथे लवकर जाण्यामागचे कारण विषद केले आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवरील विलक्षण उसळी आणि गती समजून घेण्यासाठी तेथे लवकर जाणे आवश्यक असल्याचा खुलासा द्रविड यांनी केला आहे. उसळी आणि गती समजून घेण्यासाठी टीम इंडिया पर्थमध्ये तळ ठोकून बसणार आहे. तेथील सराव शिबिरात अभ्यास करणार आहे. हे सारे नियोजनाचा भाग असले, तरी सर्वच मैदानावरील खेळपट्ट्या एकसारख्या असतील कशावरून? वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी अधिकचा अवधी आवश्यक असणे एकवेळ समजू शकतो; पण उसळी आणि गतीचा मुद्दा पटू शकत नाही. म्हणजे, ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ असे म्हणण्यासारखाच हा नकारात्मक पवित्रा झाला, म्हणा ना! तसे असते तर खेळपट्ट्या आणि वातावरण यांच्याशी वर्षानुवर्षे एकरूप असणाऱ्या यजमान देशांनीच मालिका आणि स्पर्धा जिंकल्या असत्या ना!

खेळपट्ट्या आणि वातावरण हे जय-पराजयाशी संबंधित एक घटक असले, तरी जो विशिष्ट दिवशी उत्तम खेळ करतो, तोच जिंकतो, या महत्त्वपूर्ण सूत्राकडे अधिक लक्ष्य केंद्रित करणे जरूरीचे आहे. म्हणूनच कागदावरील चपखल रणनीती, डावपेच यांचा प्रत्यक्ष मैदानावरील प्रभावी अंमल हाच निर्णायक ठरणार आहे. तेव्हा ठोस रणनीती आणि या रणनीतीला अनुसरून कठोर सराव यालाच उसळी आणि गती देण्याची आवश्यकता आहे, खरोखरच.

टी-२० वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने निवडलेल्या १५ खेळाडूपैकी ऑस्ट्रेलियाला फक्त १४ खेळाडू गेले आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला जाण्याआधीच्या फोटोतूनही हे स्पष्ट दिसते. यात खेळाडूंपेक्षा सपोर्ट स्टाफ जास्त असल्याचेही जाणवते, हे विशेष. बीसीसीआयने खेळाडूंचा फोटो शेअर करताना ‘पिक्चर परफेक्ट. टी-२० वर्ल्डकप, आम्ही येत आहोत’, असे म्हटले आहे. आता ही केवळ दर्पोक्ती ठरू नये, हीच अपेक्षा. या फोटोत कर्णधार रोहित शर्मासह १४ खेळाडू दिसतात. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह १६ जण सपोर्ट स्टाफवाले दिसतात. म्हणजेच, टी २० विश्वचषक स्पर्धेला जेमतेम ७ दिवस राहिलेले असतानाही पंधराव्या खेळाडूबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. आता बोला!

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी चार खेळाडू स्टँडबाय म्हणजे राखीव ठेवण्यात आले आहेत. जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याने त्याच्याजागी कोणाला घेणार, ते अद्याप जाहीर केले गेलेले नाही. राखीव खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. श्रेयस, रवी आणि दीपक दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन-डे मालिका खेळत आहेत. वन-डे मालिकेनंतर हे तीन खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. या खेळाडूंना खेळपट्ट्यांवरील विलक्षण उसळी आणि गती समजून घेण्याची आवश्यकता धोरणकर्त्यांना वाटत नसावी, असे दिसते. त्यांची प्रतिभाशक्ती अल्पावधीत उसळी मारेल, असा धोरणकर्त्यांना जबर विश्वास असावा, हमखास.

असे कळते की, मोहम्मद शमीला पंधरावा खेळाडू म्हणून सामावून घेण्याबाबत संघ व्यवस्थापन ठाम आहे. कोरोनाची लागण झाल्याने शमी काही दिवस बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असणार आहे. त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, अशी शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्माला बुमराहच्या जागी मोहम्मद शमीच हवा असल्याचे सांगण्यात येत आहे. असे होते तर मग मुख्य संघात शमीला का समाविष्ट करण्यात आले नाही? त्याला राखीव का ठेवले? संघनिवडीच्या वेळी तर तो कोरोना पॉझिटिव्ह नव्हता. आता रोहित अजूनही शमी कधी फिट होतो, याकडे लक्ष लावून आहे, म्हणे. शमीला विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत खेळेल, असे वाटत होते; पण त्याला कोरोना झाला. उपचार, विश्रांती यानंतर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठविण्यात आले आहे. सध्या तो अकादमीमध्येच आहे. त्याची फिटनेस टेस्ट अजूनही झालेली नाही. शमीच्या फिटनेस टेस्टचा अहवाल नेमका काय येतो, याच्या प्रतिक्षेत कर्णधार आणि व्यवस्थापन आहे.

नेमका बुमराह संघाबाहेर जाताच संघातअनुभवी गोलंदाज नसल्याची जाणीव संघ व्यवस्थापनाला व्हावी, हेही आश्चर्यकारक आहे. वास्तविक, अंतिम अकरा खेळाडूंमध्येही एखादा खेळाडू जायबंदी होण्याची शक्यता गृहित धरून अंतिम अकरा संघातच विशिष्ट फळीत पर्यायी खेळाडू असणे जरुरीचे मानले पाहिजे. डाव सावरण्यासाठी एक फळी अयशस्वी ठरली की दुसरी फळी असते, अगदी तस्से! बुमराहच्या निमित्ताने हे अधोरेखित झाले ते चांगलेच झाले. विश्वचषकासाठी शमी पाहिजे, असा रोहितचा हट्ट म्हणूनच तसा रास्त म्हणावा लागेल. शमीकडे गोलंदाजीचा दांडगा अनुभव आहे. त्याच्यामुळे भारताची गोलंदाजी अधिक धारधार होऊ शकते, हे निवड समितीला आधीच का सुचले नाही? ठीक आहे, ‘देर आये दुरुस्त आये’. आता शमीच्या फिटनेस टेस्टवर सर्व काही अवलंबून आहे. जर शमी फिट नसेल तर बुमराहच्या जागी दीपक चहर किंवा मोहम्मद सिराज यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते; पण रोहित आणि द्रविड हे शमीसाठी इतके आग्रही आहेत की ते शमीच्या फिटनेस टेस्टसाठी कितीही वेळ थांबायला तयार आहेत, असेच दिसते. मग भले, नका का त्याला किंवा इतर राखीव खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवरील विलक्षण उसळी आणि गती समजून घेण्यासाठी वेळ मिळो! वास्तविक, ‘इम्तहां हो गयी इंतजार की...’ असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत वाट पाहण्यास आता बिलकूल वेळ नाही, याचेही भान आवर्जून ठेवायला हवे.

सांगायचे तात्पर्य एवढेच की, जो संघ उपलब्ध आहे, त्याचीच मशागत करण्यावर लक्ष्य केंद्रित करणे जरूरीचे आहे. वेळ खूपच थोडा आहे. तेव्हा टी-२० वर्ल्डकप मिळवायचा असेल; तर प्रयोगशीलतेचा नित्याचा अट्टाहास टाळून, धरसोड वृत्तीची खोड सोडून अन‌् व्यवहार्य नियोजनाची जोरदार उसळी मारून प्रभावी रणनीती ठरविण्याच्या प्रक्रियेला दमदार गती दिली पाहिजे, खचितच. ‘बैल गेला नि झोपा केला’, असे कदापि होऊ देता कामा नये, निश्चितच.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in