गोलंदाजांचाच गाजावाजा! कमिन्सला २०.५० कोटींचा भाव; भारतीयांमध्ये हर्षल सर्वाधिक महागडा

कमिन्सने विक्रम रचल्यावर काही मिनिटांच्या अवधीतच स्टार्कने त्याला पिछाडीवर टाकून नवा विक्रम प्रस्थापित केला
गोलंदाजांचाच गाजावाजा! कमिन्सला २०.५० कोटींचा भाव; भारतीयांमध्ये हर्षल सर्वाधिक महागडा
PM

दुबई : ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी यंदाचे वर्ष फारच लाभदायी ठरत आहे. ऑस्ट्रेलियाने यंदाच्या वर्षात जागतिक कसोटी अजिंक्यपद, अॅशेस मालिका आणि एकदिवसीय विश्वचषक या तीन प्रतिष्ठित स्पर्धांचे जेतेपद मिळवले. इतके कमी म्हणून की काय मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १७व्या हंगामासाठी दुबईत झालेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेतही (मिनी ऑक्शन) ऑस्ट्रेलियन खेळाडूंचेच वर्चस्व दिसून आले. अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाइट रायडर्सने तब्बल २४.७५ कोटी रुपये मोजले. स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील आजवरचा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला.

ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या संघाचा कर्णधार आणि स्टार्कचाच वेगवान जोडीदार पॅट कमिन्सवर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लावण्यात आली. सनरायजर्स हैदराबादने कमिन्सला २०.५० कोटी रुपयांत संघात सहभागी केले. त्यामुळे कांगारूंच्या खेळाडूंनी विक्रमी कोटींची उड्डाणे घेतल्याचे यंदाच्या लिलावाद्वारे स्पष्ट झाले. भारतीयांचा विचार करता मध्यमगती गोलंदाज तसेच उपयुक्त फलंदाज हर्षल पटेल सर्वाधिक महागडा ठरला. हर्षलला पंजाब किंग्जने ११.७५ कोटींमध्ये संघात दाखल केले. यंदाच्या लिलावातील सर्वाधिक महागड्या खेळाडूंचा विचार करता हर्षलचा चौथा क्रमांक येतो. तिसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्जकडे १४ कोटींत गेलेला डॅरेल मिचेल, तर पाचव्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ११.५० कोटींमध्ये भाग झालेला अल्झारी जोसेफ आहे.

गेल्या वर्षी झालेल्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. त्याला पंजाब किंग्जने १८.५० कोटींमध्ये संघात शामील केले होते. यावेळीही १९ कोटींचा पल्ला कोणी गाठणार का, याची उत्सुकता होती. रचीन रवींद्र (१.८० कोटी), वानिंदू हसरंगा (१.५० कोटी) हे स्वस्तात अनुक्रमे चेन्नई व हैदराबाद संघाचा भाग झाले. मात्र त्यानंतर कमिन्सने सर्वप्रथम आयपीएलमधील महागडा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. कमिन्ससाठी बंगळुरू व हैदराबाद शर्यतीत होते. मात्र बंगळुरूकडे २३ कोटी इतकीच रक्कम असल्याने बोली २० कोटींच्या पुढे गेल्यावर त्यांनी मागे हटण्याचे ठरवले.

कमिन्सने विक्रम रचल्यावर काही मिनिटांच्या अवधीतच स्टार्कने त्याला पिछाडीवर टाकून नवा विक्रम प्रस्थापित केला. स्टार्कसाठी गुजरात व कोलकाता यांच्यामध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू होती. मुंबई इंडियन्सनेसुद्धा यामध्ये काही काळ उत्सुकता दर्शवली. अखेरीस कोलकाताने बाजी मारून ८ वर्षांनी पुन्हा आयपीएल खेळणाऱ्या स्टार्कला संघात सहभागी केले. ऑस्ट्रेलियाचाच अन्य वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला मात्र कोणीही वाली लाभला नाही. ३३ वर्षीय स्टार्क व ३० वर्षीय कमिन्स यांनी यंदाच्या वर्षात सातत्याने भेदक मारा केला आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी शतक झळकावणाऱ्या ट्रेव्हिस हेडला हैदराबादने ६.८० कोटी रुपयांत खरेदी केली.

यंदा प्रथमच भारताबाहेर झालेल्या आयपीएल लिलावात मल्लिका सागर या महिलेने ऑक्शनरची भूमिका बजावली. तसेच ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सच्या चमूत पाहून उपस्थित प्रेक्षकही आनंदी झाले. मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १७व्या हंगामासाठी चाहते आतुर झाले आहेत.

मी खरोखरच इतकी रक्कम अपेक्षित केलेली नव्हती. माझी पत्नी एलिसा ही कसोटी सामना खेळण्यासाठी भारतात असल्याने तिनेच मी टीव्हीवर पाहण्यापूर्वी त्वरित फोन करून माझ्यासाठी २४ कोटींपेक्षा अधिक बोली लागल्याचे सांगितले. आयपीएलमध्ये परतण्यास उत्सुक असून माझ्यावरील बोलीचे फारसे दडपण न घेता कोलकातासाठी सर्वोत्तम कामगिरी करेन.

- मिचेल स्टार्क

अनकॅप्ड खेळाडूंमध्ये समीरला महाबोली

भारतातील अनकॅप्ड खेळाडूंचा (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या) विचार करता समीर रिझवीला चेन्नईने ८.४० कोटींमध्ये विकत घेतले. उत्तर प्रदेशातील २० वर्षीय समीर हा धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो.

logo
marathi.freepressjournal.in