
नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंग महासंघ (बीएफआय) गेल्या वर्षभरात मूलभूत जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे महासंघात सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी आणि योग्य प्रशासनासाठी महासंघावर अस्थायी समितीची नियुक्ती आवश्यक होती, अशा परखडपणे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी. टी. उषा यांनी कारवाईचे समर्थन केले.
अर्थात अजूनही उषा यांची ही कारवाई एकतर्फीच मानली जात आहे. कार्यकारिणीतून त्यांना होणारा विरोध कायम असून, ‘आयओए’ उपाध्यक्ष गगन नारंग यांनीच २८ फेब्रुवारीस पत्र लिहून उषा यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करून निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. या पत्राला उत्तर म्हणून उषा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाने ‘आयओए’च्या या आदेशाला स्थगिती दिली असूनही उषा आपली भूमिका सोडण्यास तयार नाहीत.
“माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा मनमानी कारभार झालेला नाही. महासंघाच्या कामकाजात पारदर्शीपणा यावा आणि योग्य प्रशासन सुनिश्चित व्हावे यासाठीच उचललेले हे पाऊल आहे,” असे उषा यांनी नारंग यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. “आपल्याला विरोध करणारे कार्यकारिणी सदस्य भारतीय खेळापेक्षा वैयक्तिक हिताला पसंती देत आहेत,” अशी टीकाही उषा यांनी केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर यांच्या नियुक्तीपासून ‘आयओए’ कार्यकारिणी सदस्यांशी सुरू असलेला अध्यक्ष उषा यांचा संघर्ष या नव्या वादानंतरही कायमच राहिला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला बॉक्सिंगमध्ये एकही पदक जिंकता आले नाही. त्यापूर्वी २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये लव्हलिना बोर्गोहैनने कांस्यपदक जिंकले होते. मात्र गेल्या काही काळापासून भारताची बॉक्सिंगमध्ये कामगिरी ढासळली आहे.
ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताची बाजू भक्कम
२०३६च्या ऑलिम्पिक यजमानपदाची स्पर्धा कठीण असली, तरी भारताची बाजू भक्कम असल्याचे मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) निवडणुकीतील अध्यक्षपदाचे प्रमुख उमेदवार असलेल्या सेबॅस्टियन को यांनी व्यक्त केले आहे. भारताने २०३६ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी ‘आयओसी’कडे इरादा पत्र सादर केले आहे. यजमानपदाच्या कठीण परिक्षेतील हे पहिले पाऊल होते. ऑलिम्पिक यजमानपदासाठी केवळ भारत हा एकमेव देश बोली लावणार नाही. पोलंड, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, कतार, हंगेरी, तुर्की, मेक्सिको, इजिप्त असे अन्य देशही या शर्यतीत आहेत. मात्र, स्पर्धेचे आयोजन करताना भारत जे काही करू शकतो त्याचा त्यांना भक्कम आधार मिळेल, असे को यांनी सांगितले.