
सिडनी : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करायची असेल तर आधी मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज ब्रॅड हॅडीनने व्यक्त केले. इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला असून त्यात खराब क्षेत्ररक्षणाचा फटका भारताला बसला आहे.
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यशस्वी जयस्वालने गचाळ क्षेत्ररक्षण केले. त्याने काही झेल सोडले. त्याचा फटका भारताला बसला. हेडिंग्ले कसोटीत भारतीय संघ ५ विकेट्सने पराभूत झाला. ५ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर पडला आहे. ४७ वर्षीय हॅडीनने ऑस्ट्रेलियासाठी ६६ कसोटी सामने खेळले असून क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून त्याच्या खात्यात ६५०० पेक्षा अधिक धावा आहेत. कोणत्याही काळातील महान संघ बघा, त्यांच्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ही एक गोष्ट महत्त्वाची असते. मला वाटते की शुभमनचा संघही आपल्या क्षेत्ररक्षणात सुधारणा करू शकतो, असे हॅडीन म्हणाला. जर क्षेत्ररक्षणात सुधारणा हवी असेल तर तुम्हाला तुमच्या मानसिकतेत बदल करावा लागेल. भारताकडे असलेली क्षमता पाहता तो संघ जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ बनण्यात काहीच अडथळा नाही, असे हॅडीनला वाटते.
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला. खराब क्षेत्ररक्षणामुळे भारताने हा सामना हातून गमावला. गिलने या कसोटीत झेल सोडल्याने भारताने विजयाची संधी गमावली. क्षेत्ररक्षकांच्या खराब क्षेत्ररक्षणानंतर माजी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंच्या उणीवांवर बोट ठेवले. हॅडीनने मानसिकतेत बदल करण्याचा सल्ला दिला.