FIFA World Cup 2026 : ब्राझीलचा बोलबाला; स्कॉटलंडचा धुव्वा

तारांकित आक्रमणपटू व्हिनिशियस ज्युनियरने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलने फिफा विश्वचषकातील क-गटात स्कॉटलंडचा ३-० असा पराभव करत बाद फेरीत धडक मारली.
FIFA World Cup 2026 : ब्राझीलचा बोलबाला; स्कॉटलंडचा धुव्वा
FIFA World Cup 2026 : ब्राझीलचा बोलबाला; स्कॉटलंडचा धुव्वा(Photo-X)
Published on

मियामी गार्डन्स : तारांकित आक्रमणपटू व्हिनिशियस ज्युनियरने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलने फिफा विश्वचषकातील क-गटात स्कॉटलंडचा ३-० असा पराभव करत बाद फेरीत धडक मारली. ब्राझीलने गटात अग्रस्थान पटकावले. मॅथ्यूस कुन्हानेही एक गोल नोंदवला. प्रत्येक गोलनंतर ब्राझीलच्या खेळाडूंनी केलेले सेलिब्रेशन पाहण्याजोगे होते. नेयमार या लढतीच्या निमित्ताने ब्राझीलच्या संघात परतला.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू झाला आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले आहेत. यंदा एका गटात प्रत्येकी चार संघ याप्रमाणे १२ गटांमध्ये ४८ संघांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ आणि तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघ असे मिळून एकूण ३२ संघ पुढील फेरी गाठतील. त्यामुळे आता थरार आणखी वाढत आहे.

व्हिनिशियसने सामन्याच्या सातव्या मिनिटाला पहिला गोल करत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्यांतरापूर्वी त्याने आपला दुसरा गोल करत संघाची पकड मजबूत केली. व्हिनिशियसचा तिसरा गोल फाऊलमुळे नाकारण्यात आला. दुसऱ्या सत्रात कुन्हाने ६०व्या मिनिटाला ब्राझीलचा तिसरा गोल झळकावून विजय पक्का केला. कुन्हाचेसुद्धा स्पर्धेत ३ गोल झाले आहेत.

आता व्हिनिशियसचे स्पर्धेतील एकूण गोल चार झाले असून, तो फ्रान्सच्या किलियान एम्बाप्पेच्या बरोबरीवर पोहोचला आहे. सध्या अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी पाच गोलसह आघाडीवर आहे. ब्राझीलला पहिल्या लढतीत मोरोक्कोने बरोबरीत रोखले होते. त्यानंतर ब्राझीलने हैतीला धूळ चारली. आता स्कॉटलंडला नमवून त्यांनी आगेकूच केली. बाद फेरीत त्यांच्यासमोर जपान किंवा नेदरलँड्सचे आव्हान असू शकते.

तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या स्कॉटलंडसाठी ही स्पर्धा संमिश्र राहिली. त्यांचे ३ सामन्यांत ३ गुण आहेत. १९९८ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकात खेळणाऱ्या स्कॉटलंडच्या संघाला बाद फेरी गाठण्याची किंचीतशी संधी आहे. विश्वचषकाच्या इतिहासात नऊ प्रयत्नांत एकदाही बाद फेरीत स्थान न मिळवण्याचा स्कॉटलंडचा विक्रम आहे. दरम्यान, सर्वांचे लक्ष मात्र ब्राझीलकडे लागून असून ते यंदा सहावा विश्वचषक जिंकणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

२४ वर्षांनी म्हणजेच २००२नंतर प्रथमच ब्राझीलसाठी एखाद्या खेळाडूने विश्वचषकातील पहिल्या तिन्ही सामन्यांत किमान एक गोल नोंदवला आहे. यंदा व्हिनिशियसने अशी कामगिरी केली, तर २००२मध्ये महान फुटबॉलपटू रोनाल्डोने हा पराक्रम केला होता.

गोलफलक

  • ब्राझील (३) - स्कॉटलंड (०)

  • व्हिनिशियस (७, ४५+३ मि.)

  • कुन्हा (६०)

९८१ दिवसांनी नेयमार परतला

या सामन्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे स्टार खेळाडू नेमारचे मैदानावरील पुनरागमन. उजव्या पायाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकलेल्या नेमारने ७६व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून प्रवेश केला. नेमारच्या मैदानावर येण्याने ‘हार्ड रॉक स्टेडियम’मधील ब्राझीलच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. नेमारच्या नावावर १३० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ७९ गोल असून, तो ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. २०२३ नंतर म्हणजेच एकूण ९८१ दिवसांनी नेयमार ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in