युवराजचा २५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, मुंबईविरुद्ध १९ वर्षीय प्रखरची 'मॅरेथॉन' खेळी

युवराजने १९९९मध्ये पंजाबकडून खेळताना बिहारविरुद्ध याच स्पर्धेत ३५८ धावा केल्या होत्या. महेंद्रसिंह धोनी त्यावेळी बिहार संघाचा सदस्य होता.
युवराजचा २५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, मुंबईविरुद्ध १९ वर्षीय प्रखरची 'मॅरेथॉन' खेळी

शिवमोग्गा : कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने सोमवारी कूच बिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्धच्या अंतिम फेरीत ६३६ चेंडूंत तब्बल नाबाद ४०४ धावा फटकावल्या. त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचा २५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. त्याच्या मॅरेथॉन खेळीच्या बळावर कर्नाटकने मुंबईचा पहिल्या डावातील आघाडीमुळे पराभव केला.

युवराजने १९९९मध्ये पंजाबकडून खेळताना बिहारविरुद्ध याच स्पर्धेत ३५८ धावा केल्या होत्या. महेंद्रसिंह धोनी त्यावेळी बिहार संघाचा सदस्य होता. दरम्यान, १९ वर्षांखालील स्थानिक स्पर्धेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम महाराष्ट्राच्या विजय झोलच्या नावावर आहे. त्याने २०११-१२मध्ये आसामविरुद्ध नाबाद ४५१ धावा केल्या होत्या.

प्रखरने ४०४ धावांच्या खेळीत ४६ चौकार व ३ षटकार लगावले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने आयुष म्हात्रेच्या (१४५) शतकामुळे ३८० धावा केल्या. मात्र प्रखरने ४०४, तर हर्षिल धर्मानीने १६९ धावा फटकावल्याने कर्नाटकने तब्बल ८ बाद ८९० धावांचा डोंगर उभारला. कूच बिहार स्पर्धेच्या अंतिम फेरीत ४०० धावा करणारा प्रखर हा पहिला फलंदाज ठरला.

logo
marathi.freepressjournal.in