
लंडन : भारतीय संघ पूर्णपणे तयारी करून आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला आला आहे; परंतु आमचे उद्दिष्ट स्पष्ट असल्याचे इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकक्युलम म्हणाले. २० जूनपासून लीड्स कसोटीला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मॅकक्युलम यांनी एका क्रीडा वाहिनीशी बोलताना इंग्लंडच्या मजबूत तयारीचे संकेत दिले.
भारताचा संघ तगडा आहे. इंग्लंडमध्ये ते मोठ्या आशा घेऊन आले आहेत. आम्हीही त्यांना खेळताना पाहायला उत्सुक आहोत, असे मॅकक्युलम म्हणाले.
मर्यादित षटकांच्या सहा सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला आहे. आता या संघाले लक्ष्य भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेकडे आहे. त्यानंतर इंग्लंड अशेस मालिका खेळणार आहे.
कसोटी संघ म्हणून आम्हाला काय करायचे आहे याची आम्हाला जाणीव आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मार्क वुड हा किमान पहिल्या तीन सामन्यांतून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चरही पहिला कसोटी सामना खेळणार नाही. गस ॲटकिन्सन हा दुखापतीतून सावरत आहे. असे असतानाही मॅकक्युलमला इंग्लंडच्या गोलंदाजीवर विश्वास आहे.
इंग्लंडच्या ताफ्यात तगडे गोलंदाज
काही दर्जेदार गोलंदाज उपलब्ध नसले तरी क्रिस वोक्स, सॅम कुक, ब्रॅडन कार्से, जेमी ओव्हरटन, जोश टाँग असे तगडे गोलंदाज इंग्लंडच्या ताफ्यात आहेत, असे मॅककुलम म्हणाले. आमच्याकडे शोएब बशीरचा पर्याय आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो प्रगती करत आहे. भारतीय संघ हा तयारीत आलेला आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आमची परीक्षा आहे, असे मॅककुलम म्हणाले.