भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंची चमकदार कामगिरी,लालरिनुंगाने पटकावले सुवर्णपदक

आतापर्यंत भारताला पाच पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहेत.
भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंची चमकदार कामगिरी,लालरिनुंगाने पटकावले सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरू ठेवली असून स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने ६७ किलो वजनी गटात एकूण ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले . २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. जेरेमीने स्नॅच इव्हेंटमध्ये १४० किलो वजन उचलून नवीन राष्ट्रकुल विक्रमाचीही नोंद केली. आतापर्यंत भारताला पाच पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहेत. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक पटकाविले आहे.

क्लीन अॅण्ड जर्क विभागात १९ वर्षांच्या जेरेमीने १६० किलो वजनासह एकूण ३०० किलो वजन उचलले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हादेखील एक नवीन विक्रम ठरला. १६५ किलो वजन उचलण्याच्या अंतिम प्रयत्नाच्या शेवटी जेरेमीला दुखापत झाल्याने तो शेवटचा प्रयत्न पूर्ण करू शकला नाही. तरीसुध्दा तो सुवर्णपदावर आपले नाव कोरण्यात यशस्वी ठरला.

या खेळांमधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. मीराबाई चानूने रविवारी सुवर्णपदक पटकाविले होते. सामोआचा अनुभवी लिफ्टर वैपावा इओनेने एकत्रित २९३ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले, तर नायजेरियाच्या एडिडिओंग उमोफियाने २९० किलो वजन उचलून कांस्यपदकावर नाव कोरले.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत पाच पदके जिंकली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. जेरेमी लालरिनुंगापूर्वी शनिवारी संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. त्यानंतर गुरुराजा पुजारीने ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळविले. त्याचवेळी ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले. बिंदियाराणी देवीने भारताला चौथे पदक मिळवून दिले. तिने ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळविले. राष्ट्रकुलच्या इतिहासात वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे १३० वे पदक ठरले. भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाने जास्त पदके जिंकली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी रविवारी भारतीय महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानशी सामना झाला. निखत झरीन आणि शिव थापा यांनी बॉक्सिंगमध्ये लढत दिली. बॅडमिंटनमधील मिश्र सांघिक स्पर्धेत भारताचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. पुरुष हॉकी संघानेही आपल्या मोहिमेला सुरुवात केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in