पॅरिस : भारतीय पुरुष हॉकी संघाचे १९८०नंतर पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्यानंतर अखेर स्पेनला २-१ असे हरवून भारताने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक कांस्यपदकाची कमाई केली. नेमबाजीतील तीन कांस्यपदकांनंतर पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे चौथे पदक ठरले. भारताने ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ पी. आर. श्रीजेशला ऑलिम्पिक पदकासह निरोप दिला. विनेश फोगटच्या अपात्रता प्रकरणानंतर हॉकीतील हे पदक भारताच्या दु:खावर फुंकर घालणारे ठरले.
अखेरच्या क्षणापर्यंत २-१ अशा आघाडीवर असताना शेवटच्या क्षणी लागोपाठ अनेक पेनल्टी कॉर्नर मिळवत सामन्यातील रंगत आणखीन वाढवली होती. पण भारताची अभेद्य भिंत, गोलरक्षक श्रीजेशच्या कामगिरीपुढे त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. भारतीय हॉकी संघाने २०२० टोकियो ऑलिम्पिकनंतर सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकण्याची करामत केली. गेल्या वेळी १९६८ च्या मेक्सिको आणि १९७२च्या म्युनिच ऑलिम्पिकमध्ये सलग दोन कांस्यपदके जिंकली होती.
उपांत्य फेरीत जर्मनीकडून २-३ अशा धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारताने स्पेनला सामन्यात डोके वर काढण्याची कोणतीही संधी दिली नाही. कर्णधार हरमनप्रीत सिंग हाच भारतासाठी तारणहार ठरला. त्याने ३०व्या आणि ३३व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळेच भारताला हा सामना जिंकता आला. प्रत्येक सामन्यात गोल झळकावणाऱ्या हरमनप्रीतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तब्बल १० गोल लगावण्याची करामत केली.
ऑलिम्पिकमध्ये हॉकी
८ सुवर्ण : १९२८ ॲम्स्टरडॅम, १९३२ लॉस एंजेलिस, १९३६ बर्लिन, १९४८ लंडन, १९५२ हेलसिंकी, १९५६ मेलबर्न, १९६४ टोकियो, १९८० मॉस्को
१ रौप्य : १९६० रोम
४ कांस्य : १९६८ मेक्सिको, १९७२ म्युनिच, २०२० टोकियो, २०२४ पॅरिस.