

मुंबई : विरारच्या १८ वर्षीय आयुष म्हात्रेकडे आगामी अखिल भारतीय बुची बाबू निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राच्या संघात पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे.
क्रिकेट तमिळनाडू असोसिएशनतर्फे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा १८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत बुची बाबू स्पर्धा रंगणार आहे. दुलीप ट्रॉफीत खेळणारे खेळाडू या स्पर्धेत काही लढतींसाठीच सहभागी होतील. तमिळनाडूच्या क्रिकेटमधील पितामह मोठावरप्पू व्यंकट महिपती नायडू यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा १९१० पासून आयोजित केली जाते. गतवर्षी १२ वर्षांनी ही स्पर्धा झाली. त्यामध्ये हैदराबादने विजेतेपद मिळवले. यंदा १६ संघ सहभागी होणार असून तमिळनाडू प्रेसिडेंटच्या नावाने २ संघही खेळणार आहेत. विजेत्याला ३ लाखांचे पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेत पहिला डाव ९० षटकांचा, तर दुसरा डाव ४५ षटकांचा असतो. साखळी सामने तीन दिवसांचे, तर बाद फेरीच्या लढती ४ दिवसांचे होतील. १६ संघांना चार गटांत विभाजित केल्यावर प्रत्येक गटातील आघाडीचे संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
दरम्यान, या स्पर्धेसाठी मुंबईचे नेतृत्व आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना छाप पाडणाऱ्या मराठमोळ्या आयुषकडे सोपवण्यात आले आहे. आयुषने नुकताच इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध भारतीय युवा संघाचे नेतृत्व केले होते. सुवेद पारकर उपकर्णधार असून सर्फराझ खान, मुशीर खान यांचाही मुंबईच्या संघात समावेश आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राचे नेतृत्व अनुभवी अंकित बावणे करणार आहे. मात्र या स्पर्धेद्वारे २५ वर्षीय पृथ्वी महाराष्ट्राकडून पदार्पण करेल. गैरवर्तन व वाढलेल्या वजनामुळे पृथ्वीने मुंबईच्या संघातील स्थान गमावल्यावर आता देशांतर्गत स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळण्याचे ठरवले आहे. तसेच आयपीएलमध्ये हाताच्या दुखापतीमुळे बाहेर गेलेला ऋतुराज या स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळणार आहे.
मुंबईचा संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), मुशीर खान, दिव्यांश सक्सेना, सर्फराझ खान, सुवेद पारकर, प्रज्ञेश कानपिल्लेवर, हर्ष अघव, साईराज पाटील, आकाश पारकर, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, श्रेयस गुरव, यश डिचोलकर, हिमांशू सिंग, रॉयस्टन डायस, सेल्व्हेस्टर डीसोझा, इरफान उमेर.
महाराष्ट्राचा संघ
अंकित बावणे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, सिद्धेश वीर, सचिन धस, अर्शीन कुलकर्णी, हर्षल काटे, सिद्धार्थ म्हात्रे, सौरभ नवाळे, मंदार भंडारी, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप दाढे, विकी ओस्तवाल, हितेश वाळुंज, प्रशांत सोलंकी, राजवर्धन इंर्पोकर