

मियामी गार्डन्स : फिफा विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या आणि थरारक सामन्यात बुकायो साकाच्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर इंग्लंडने फ्रान्सचा ६-४ असा पराभव केला. २७ वर्षीय एम्बाप्पेने उत्तरार्धात दोन गोल करत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक २२ गोल करण्याचा अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचा विक्रम मोडीत काढला.
एम्बाप्पेचे या विश्वचषकात एकूण १० गोल झाले असून ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत त्याने मेस्सीवर दोन गोल्सची आघाडी घेतली आहे. १९८२ मध्ये हंगेरीने एल साल्वाडोरचा १०-१ असा पराभव केल्यानंतरचा हा विश्वचषकातील सर्वाधिक गोल्सचा सामना ठरला असून, तिसऱ्या स्थानाच्या लढतीतील हे आजवरचे सर्वाधिक १० गोल आहेत.
इंग्लंडसाठी बुकायो साकाने ३७व्या मिनिटाला आणि पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत गोल केले, तर ८७व्या मिनिटाला पेनल्टीवर तिसरा गोल करत आपल्या कारकिर्दीतील दुसरी आंतरराष्ट्रीय हॅटट्रिक पूर्ण केली. डेक्लान राईस आणि एझरी कोन्सा यांनीही गोल केल्यामुळे इंग्लंडने पूर्वार्धात ४-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. फ्रान्सच्या आक्रमणासमोर इंग्लंडने उत्तरार्धात आघाडी टिकवून ठेवत विश्वचषकातील आपले दुसरे सर्वोत्तम स्थान निश्चित केले.
इंग्लंडने १९६६ मध्ये आपले एकमेव जेतेपद जिंकले होते. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक थॉमस टुचेल यांनी सांगितले की, “खेळाडूंना या कामगिरीचा अभिमान वाटेल, अशी आशा आहे. आम्ही अत्यंत स्पर्धात्मक आहोत, त्यामुळे १८ महिन्यांपूर्वी अंतिम फेरीत पोहोचण्याचे आणि विश्वचषक जिंकण्याचे मोठे स्वप्न पाहिल्यामुळे केवळ तिसऱ्या स्थानाचा पूर्ण आनंद घेता येत नसला, तरी हा विजय अर्जेंटिना आणि फ्रान्ससारख्या संघांमधील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल ठरेल.”
ज्युड बेलिंगहॅमने सामन्यातील शेवटचा आणि यंदाच्या स्पर्धेतील आपला सातवा गोल केला. एकाच विश्वचषकात सर्वाधिक सात गोल करण्याचा विक्रम आता बेलिंगहॅमच्या नावावर नोंदवला गेला. कर्णधार हॅरी केनने २०१८ आणि यंदा प्रत्येकी सहा गोल केले होते, तर गॅरी लिनकरने १९८६ मध्ये सहा गोल केले होते.
गोलफलक
इंग्लंड (६)
डेक्लन राइस (३)
इझ्री कोन्सा (१८)
बुकायो साका (३७, ४५, ८७)
ज्युड बेलिंगहॅम (९०+८)
फ्रान्स (४)
किलियन एम्बाप्पे (४८, ६६ मि.)
बार्कोला (५४)
ओसमाने डेम्बेले (९०+६)
मणिपूर, मिझोराममध्ये आज शाळांना सुट्टी
इम्फाळ : फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना विद्यार्थ्यांना पाहता यावा, यासाठी मणिपूर तसेच मिझोराम सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, मणिपूरच्या राज्यपालांनी सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठे २० जुलै रोजी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजता होणारा फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना पाहता यावा आणि त्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.