भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून बरे झाले असून दोघेही तंदुरुस्तीची चाचणी उत्तीर्ण झाले आहेत. आता टी-२० विश्वचषकासाठी निवड होणाऱ्या संघासाठी हे दोन्ही वेगवान गोलंदाज आता उपलब्ध असणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगळुरू येथील एनसीएमध्ये झालेल्या गोलंदाजीच्या चाचणीत दोघेही पास झाले आहेत. दोघांचे पुनरागमन टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बुमराह आणि पटेल हे दोघेही दुखापतींमुळे आशिया चषक २०२२ स्पर्धेत खेळू शकले नव्हते. आशिया चषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माहिती दिली की, बुमराह आणि हर्षल एनसीएमध्ये आहेत. बुमराहला जुलैमध्ये पाठीला दुखापत झाली होती. हर्षलला वन साइड स्ट्रेनने सतावले होते.
बुमराह दुखापतीमुळे यापूर्वीही क्रिकेटपासून दूर होता. २०१९मध्ये वर्ल्डकपनंतर त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्याच्या पाठीच्या खालील भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर तो बराच काळ संघाबाहेर होता. बुमराहच्या चेंडू टाकण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे त्याच्या पाठीवर खूप ताण येतो. आता या दुखापतीतून सावरल्यानंतर तो कशी कामगिरी करतो, ते महत्त्वाचे ठरणार आहे. हर्षल गेल्या वर्षी पदार्पण केल्यापासून टी-२० मध्ये डेथ-ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून उदयास आला. २०२२ मध्ये त्याने टी-२० च्या १५ सामन्यांमध्ये ८.७६ च्या इकॉनॉमी रेटने १९ विकेट्स घेतल्या. भारताकडून फक्त भुवनेश्वरने १० सामन्यांत २० विकेट्स घेतल्या आहेत.
हर्षलने आयपीएलच्या मागील दोन हंगामातही अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने आयपीएल २०२१ मध्ये १५ सामन्यांत ३२ विकेट्स घेत पर्पल कॅप मिळविली होती. त्याचबरोबर यंदाच्या आयपीएलमध्ये हर्षलने १५ सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याची यशस्वी फिटनेस टेस्ट भारताला दिलासा देणारी आहे.