IND Vs ENG: आधी डोकेदुखी; नंतर दिलासा; दुखापतीमुळे नितीश, अर्शदीप संघाबाहेर, बुमरा मात्र चौथ्या कसोटीत खेळणार

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त केले होते. मात्र सोमवारी सायंकाळी मिळालेल्या एका बातमीने भारतीय संघासह तमाम देशवासीयांना दिलासा दिला.
IND Vs ENG: आधी डोकेदुखी; नंतर दिलासा; दुखापतीमुळे नितीश, अर्शदीप संघाबाहेर, बुमरा मात्र चौथ्या कसोटीत खेळणार
Published on

मँचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त केले होते. मात्र सोमवारी सायंकाळी मिळालेल्या एका बातमीने भारतीय संघासह तमाम देशवासीयांना दिलासा दिला. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीस अष्टपैलू नितीश रेड्डी, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुकणार असले, तरी तारांकित जसप्रीत बुमरा या लढतीत खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता २३ जुलैपासून मँचेस्टर येथे चौथी कसोटी सुरू होईल. मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे नितीश उर्वरित मालिकेस मुकणार आहे. तसेच डावखुरा गोलंदाज अर्शदीपही डाव्या हाताच्या बोटांना झालेल्या दुखापतीमुळे किमान चौथ्या कसोटीसाठी अनुपलब्ध असेल. भारतीय संघ आधीच मालिकेत पिछाडीवर असताना बुमराही या कसोटीसाठी संघात नसता, तर आव्हान आणखी बिकट झाले असते. मात्र सोमवारी सराव सत्रानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोहम्मद सिराजने बुमरा खेळणार असल्याचे सांगितले.

“सध्या फक्त बुमरा चौथी कसोटी खेळणार आहे, इतकेच मी सांगू शकतो. संघातील अन्य खेळाडूंचे समीकरण कसे असेल, हे तुम्हाला सामन्यापूर्वीच समजेल,” असे सिराज म्हणाला. पाठदुखी आणि कामाच्या ताणाचे व्यवस्थापन या कारणांमुळे बुमरा पाचपैकी तीनच सामने खेळेल, हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारीत झालेल्या पाचव्या कसोटीपासून बुमराला या दुखापतीने ग्रासले आहे. आता बुमरा चौथी कसोटी खेळत असल्याने त्याच्यासह सिराजवर वेगवान माऱ्याची धुरा असेल.

दरम्यान, आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे आता युवा शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

इंग्रजीचा पेपर भारतासाठी नेहमीच कठीण गेला आहे. भारताने आजवर फक्त तीनदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. २००७मध्ये भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वात येथे अखेरची मालिका जिंकली. यावेळी भारताला १८ वर्षांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी असून गिल आणि कंपनी यामध्ये यशस्वी ठरेल का, हे पाहणे रंजक ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in