
येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी बीसीसीआयने 'टीम इंडिया'च्या अंतिम आणि सुधारित संघाची घोषणा केली आहे. हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेबाहेर झाला आहे. बीसीसीआयने मंगळवारी रात्री उशीरा याबाबत घोषणा केली.
जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (२०२४-२५) मधील अखेरच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत बुमराह फिट होईल या अपेक्षेने निवड समितीने त्याचा समावेश पहिल्यांदा जाहीर केलेल्या संघात केला होता. मात्र, संघात बदल करण्याच्या अखेरच्या दिवशी, मंगळवारी बुमराह या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.
बुमराहच्या जागी हर्षित राणा याचा समावेश १५ जणांमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वाल याचाही पत्ता कट झाला आहे. त्याच्याऐवजी अजून एक फिरकी गोलंदाज, वरुण चक्रवर्तीची संघात वर्णी लागली आहे.
यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे या तिन्ही खेळाडूंचा नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून समावेश करण्यात आला आहे. हे तिन्ही खेळाडू संघासोबत दुबईला जाणार नाहीत, पण आवश्यकता पडल्यास ते जाऊ शकतात.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह : यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे