
अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या मार्गावर आहेत. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दोघांवरही उपचार सुरू असून ऑगस्ट अखेरीस होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत दोघेही पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय ऋषभ पंतच्या प्रकृतीतही सुधारणा झाली आहे.
३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यान पाकिस्तान-श्रीलंका येथे आशिया चषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषकाचा थरार रंगेल. त्या पार्श्वभूमीवर एनसीएमध्ये बुमरा, श्रेयस यांच्या तंदुरुस्तीवर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक मेहनत घेत आहे. बुमरा सप्टेंबर २०२२मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. एप्रिलमध्ये बुमराच्या पाठीवर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. २९ वर्षीय बुमरा तंदुरुस्त झाल्यास भारताची गोलंदाजी अधिक बळकट होईल.
दुसरीकडे २८ वर्षीय श्रेयस मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेदरम्यान जायबंदी झाला. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस क्रिकेटपासून दूर असून मे महिन्यात लंडन येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याने सरावाला प्रारंभ केला आहे. एकदिवसीय संघात श्रेयस चौथ्या अथवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. त्यामुळे तो परतल्यावर त्याला अथवा बुमराला लगेच मुख्य संघात संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल.