इंग्लंडविरुद्ध बुमरा तीन सामने खेळणार; दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक गंभीरची माहिती

तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामन्यांपैकी फक्त तीन लढतींमध्येच खेळणार आहे, असे प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केले. तसेच मालिकेतील भारताची स्थिती व त्याच्यावरील कामाच्या ताणाचा (वर्कलोड मॅनेजमेंट) विचार करून हा निर्णय घेतला जाईल, असेही गंभीरने सांगितले.
इंग्लंडविरुद्ध बुमरा तीन सामने खेळणार; दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक गंभीरची माहिती
एक्स @HashTagCricket
Published on

मुंबई : तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामन्यांपैकी फक्त तीन लढतींमध्येच खेळणार आहे, असे प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केले. तसेच मालिकेतील भारताची स्थिती व त्याच्यावरील कामाच्या ताणाचा (वर्कलोड मॅनेजमेंट) विचार करून हा निर्णय घेतला जाईल, असेही गंभीरने सांगितले.

भारतीय संघ शुक्रवारी सकाळी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्यापूर्वी गंभीर आणि भारतीय कसोटी संघाचा नवनिर्वाचित कर्णधार शुभमन गिल यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. रोहित शर्म व विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर गिलच्या नेतृत्वात भारतीय युवा ब्रिगेडचा कस लागणार आहे. फलंदाजीत अनेक अनुभवी खेळाडू असून गोलंदाजीत बुमरावर अतिरिक्त दडपण असेल. काही दिवसांपूर्वी जेव्हा भारताचा संघ जाहीर करण्यात आला, त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी बुमराला कर्णधार न करण्याविषयी त्याच्या तंदुरुस्तीचे कारण दिले होते. बुमरा नुकताच पाठीच्या दुखापतीतून सावरला असून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो ३ किंवा ४ सामनेच खेळेल, असे आगरकर म्हणाले होते. वैद्यांनीच बुमराला पाठीवर फारसा ताण न येऊ देण्याचे सुचवले आहे.

“बुमरा इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांत खेळेल. चौथ्या सामन्यासाठी त्याची तंदुरुस्ती व मालिकेतील स्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. बुमरासारखा गोलंदाज तुमच्या संघात प्रत्येक सामन्यात असावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र तोसुद्धा माणूस असून खेळाडूच्या शरीराची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. बुमरा नेमका कोणत्या तीन सामन्यांत खेळेल, याचा निर्णय मात्र इंग्लंडला जाऊनच घेऊ,” असे गंभीर म्हणाला.

त्याशिवाय बुमराच्या अनुपस्थितीत अन्य गोलंदाजांना चमकण्याची संधी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतही बुमरा नसताना भारताने जेतेपद काबिज केले. त्यामुळे भारताकडे वेगवान गोलंदाजीत सध्या अफाट कौशल्य आहे. बुमरा ज्या कसोटींमध्ये खेळेल, तेव्हा तो त्यांना मार्गदर्शन करेलच, असेही गंभीरने नमूद केले.

खेळाडूंना स्वातंत्र्य देण्यास प्राधान्य

माझी नेतृत्वाची शैली काहीशी वेगळी आहे. मी मैदानात ते दाखवून देईनच. मात्र मैदानाबाहेरही संघातील वातावरण कसे संतुलित राहील, यावर माझा भर असेल. तसेच रोहित शर्माप्रमाणे माझेही खेळाडूंना स्वातंत्र्य देण्यास प्राधान्य राहील, असे मत भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने व्यक्त केले. प्रशिक्षक गंभीरनेही गिलच्या मताला दुजोरा देत इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in