बोलबाला बुमराचा, दमदार विजय भारताचा! इंग्लंडवर १०६ धावांनी वर्चस्व, मालिकेत १-१ अशी बरोबरी

"विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर झालेल्या या कसोटीत भारताने दिलेल्या ३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव..."
बोलबाला बुमराचा, दमदार विजय भारताचा!  इंग्लंडवर १०६ धावांनी वर्चस्व, मालिकेत १-१ अशी बरोबरी

विशाखापट्टणम : तारांकित जसप्रीत बुमरासह (४६ धावांत ३ बळी) भारताच्या अन्य गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यासमोर अखेर ‘बॅझबॉल’ शैलीत खेळणाऱ्या इंग्लंडला हार मानावी लागली. त्यामुळे भारताने सोमवारी दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशीच १०६ धावांच्या फरकाने दणदणीत विजयाची नोंद केली. रोहित शर्माच्या शिलेदारांनी या विजयासह पाच लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असून उभय संघांतील तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवण्यात येईल.

विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर झालेल्या या कसोटीत भारताने दिलेल्या ३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव ६९.२ षटकांत २९२ धावांतच संपुष्टात आला. चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातच भारतीय गोलंदाजांनी सामन्याचा निकाल लावला. विक्रमाच्या उंबरठ्यावर असलेला अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विननेही (७२ धावांत ३ बळी) दुसऱ्या डावात छाप पाडली. त्याशिवाय पहिल्या डावातील द्विशतकवीर यशस्वी जैस्वालही सामनावीर पुरस्कारासाठी शर्यतीत होता. मात्र फिरकीला पोषक खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज बुमराने अप्रतिम कामगिरी करत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. त्यामुळे लढतीत एकूण ९ बळी मिळवणाऱ्या उपकर्णधार बुमरालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

रविवारच्या १ बाद ६७ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडला विजयासाठी ३३२ धावांची आवश्यकता होती. झॅक क्रॉली व रेहान अहमद यांनी सुरुवातीच्या अर्ध्या तासात प्रत्येक षटकात किमान ४ ते ५ धावा धावा करतानाच बुमराचा पहिला स्पेलही खेळून काढला. अक्षर पटेलने अहमदला (२३) पायचीत पकडून ४५ धावांच्या भागीदारीला लगाम लावला. त्यानंतर अश्विनचे गोलंदाजीसाठी आगमन झाले. ऑली पोप व जो रूट यांनी अतिआक्रमकपणा नडला व अश्विनने या दोघांना लागोपाठच्या षटकात अनुक्रमे २३ व १६ धावांवर बाद केले. त्यामुळे इंग्लंडचा संघ ४ बाद १५४ अशा स्थितीत सापडला.

तेथून क्रॉली व जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला सावरले. पहिल्या डावात ७६ धावा करणाऱ्या क्रॉलीने यावेळीही ८ चौकार व १ षटकारांसह अर्धशतकाची वेस ओलांडली. मात्र कुलदीप यादवच्या खाली बसलेल्या चेंडूवर तो फसला व ७३ धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. पुढच्याच षटकात बुमराने धोकादायक बेअरस्टोला (२६) पायचीत पकडून उपाहाराला इंग्लंडला ६ बाद १९४ असे अडचणीत टाकले.

कर्णधार बेन स्टोक्स व यष्टिरक्षक बेन फोक्स यांनी दुसऱ्या सत्रात सावध सुरुवात केली. ही जोडी इंग्लंडला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार असे वाटत असतानाच भारतीय क्षेत्ररक्षकांना हलक्यात घेणे स्टोक्सला महागात पडले. श्रेयस अय्यरने केलेल्या अफलातून ‘डायरेक्ट थ्रो’वर स्टोक्स (११) धावचीत झाला. त्यानंतर फोक्स व टॉम हार्टली यांनी आठव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचून भारताला हैराण केले. मात्र अशा वेळी ३० वर्षीय बुमरा पुन्हा संघासाठी धावून आला. त्याने फोक्सचा ३६ धावांवर स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेतला. दुसऱ्या बाजूने मुकेश कुमारने सामन्यातील पहिला बळी पटकावताना शोएब बशीरला शून्यावर माघारी पाठवले.

इंग्लंडची ९ बाद २८१ अशी स्थिती असताना अश्विनला ५०० कसोटी बळींचा टप्पा गाठण्याची संधी मिळावी, म्हणून रोहितने पुन्हा एकदा त्याच्याकडे चेंडू सोपवला. यादरम्यान, हार्टलीला अश्विनने बादही केले. मात्र रिव्ह्यूमध्ये तो नाबाद असल्याचे स्पष्ट झाल्याने अश्विनला आता ५००व्या बळीसाठी तिसऱ्या कसोटीची प्रतीक्षा करावी लागेल. कारण ७०व्या षटकात बुमराने हार्टलीचा (३६) त्रिफळा उडवून भारताच्या शानदार विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. भारतासाठी दुसऱ्या डावात बुमरा, अश्विनने प्रत्येकी तीन, तर कुलदीप, अक्षर व मुकेश यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : सर्व बाद ३९६

इंग्लंड (पहिला डाव) : सर्व बाद २५३

भारत (दुसरा डाव) : सर्व बाद २५५

इंग्लंड (दुसरा डाव) : ६९.२ षटकांत सर्व बाद २९२

(झॅक क्रॉली ७३, बेन फोक्स ३६, टॉम हार्टली ३६; जसप्रीत बुमरा ३/४६, रविचंद्रन अश्विन ३/७२)

सामनावीर : जसप्रीत बुमरा

हे नक्की वाचा!

  • उभय संघांत आतापर्यंत झालेल्या १३३ कसोटींमध्ये भारताचा हा ३२वा विजय ठरला. इंग्लंडने ५१ कसोटी जिंकल्या आहेत, तर ५० कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.

  • अश्विनची कसोटी कारकीर्दीतील बळींची संख्या ४९९ झाली आहे. तसेच भारताकडून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत अश्विनने ९७ विकेट्ससह अग्रस्थान पटकावले. त्याने बी. एस. चंद्रशेखर (९५) यांना पिछाडीवर टाकले.

  • बुमराने या मालिकेतील २ कसोटी सामन्यांत सर्वाधिक १५ बळी मिळवले आहेत. तसेच कारकीर्दीत त्याने तिसऱ्यांदा कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून एकूण ९ बळी पटकावले.

  • ब्रँडन मॅकलमने प्रशिक्षकपद व स्टोक्सने कर्णधारपद स्वीकारल्यापासून इंग्लंडला ११ कसोटींमध्ये फक्त तिसऱ्यांदा धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले.

  • पहिल्या दोन कसोटींमध्ये भारताच्या एकाही फिरकीपटूने डावात चार पेक्षा अधिक बळी मिळवलेले नाहीत. गेल्या १२ वर्षांत मायदेशातील कसोटीत प्रथमच असे घडले.

  • तब्बल २८ वर्षांनी प्रथमच भारतासाठी २५ वर्षांखालील दोन फलंदाजांनी (यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल) एकाच कसोटीत शतक झळकावले. यापूर्वी १९९६मध्ये सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली यांनी इंग्लंडविरुद्धच अशी कामगिरी केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in