नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट शनिवारी सकाळी मायदेशी परतली आहे. विनेश फोगट दिल्लीच्या विमानतळावर पोहोचण्याअगोदर तिच्या स्वागतसाठी जनसमुदाय एकवटला होता. यावेळी भारतीय चाहत्यांनी केलेली गर्दी पाहून विनेश भावुक झाली. मात्र विनेशने केलेल्या एका पोस्टवर तिची चुलत बहीण गीता फोगट नाराज असल्याचे समजते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशसोबत जे घडले, त्यानंतर विनेशने माध्यमांच्या नजरेपासून स्वत:ला दूर ठेवले होते. तिने मायदेशी परतण्यापूर्वी फक्त इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपल्या मनातील भावना शेअर केल्या होत्या. चाहत्यांना तिची पोस्ट खूप आवडली, पण या पोस्टने तिच्याच घरचे विनेशवर नाराज झाल्याचे समजते. विनेशने तिच्या प्रवासाबद्दल तिच्या कुटुंबातील सदस्य, डॉक्टर, प्रायोजक आणि तिच्या प्रशिक्षकांचे आभार मानले. या सर्वांच्या मदतीनेच विनेशने तिच्या कारकीर्दीत आज जे काही मिळवले आहे ते साध्य करता आल्याचे तिने सांगितले.
मात्र या पोस्टमध्ये महावीर फोगट यांचे नाव नसल्याने गीता फोगटचा पती पवन सरोहाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने एक पोस्ट शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली. त्याने विनेशच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना लिहिले की, “विनेश, तू खूप छान लिहिलं आहेस, पण कदाचित आज तू तुझे काका महावीर फोगट यांना विसरली आहेस. ज्यांनी तुझ्या कुस्ती कारकीर्दीला सुरुवात करून दिली होती. देव तुला सद्बुद्धी देवो.”
काही वेळातच तिची बहीण गीता फोगटने एक पोस्ट केली. ज्यामध्ये तिने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही, परंतु तिने केलेल्या पोस्टची वेळ पाहता लोक तिचा पोस्ट संदर्भ विनेशशी जोडत आहेत. गीताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “कर्माचे फळ अतिशय सोपे असते. छळाचं फळ छळच असेल. आज किंवा उद्या ते मिळणारच आहे.” त्यामुळे गीतासुद्धा विनेशवर नाराज असल्याची चर्चा सगळीकडे रंगली असून यावर विनेशने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.