

कैरो : भारताच्या उदयवीर सिद्धूने आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) रायफल आणि पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत उदयवीरने जर्मनीचा ऑलिम्पिक पदकविजेता ख्रिश्चन रिट्झ याला अवघ्या ०.५ गुणांनी मागे टाकत विजेतेपदावर नाव कोरले.
२४ वर्षीय उदयवीरने अंतिम फेरीत २४०.६ गुणांची कमाई केली, तर रिट्झला २४०.१ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इटलीच्या पाओलो मोन्नाने २१९.८ गुणांसह कांस्यपदक जिंकले. अंतिम टप्प्यात उदयवीर आणि रिट्झ यांच्यात चुरस पाहायला मिळाली. अखेरच्या दोन नेमांपूर्वी उदयवीर ०.३ गुणांनी पिछाडीवर होता. मात्र, त्याने १०.२ आणि ९.८ गुणांची नेमबाजी केली. दुसरीकडे, रिट्झला दोन्ही नेमांत ९.६ गुण मिळाले. त्यामुळे अखेरच्या नेमात बाजी मारत उदयवीरने सुवर्णपदक निश्चित केले.
यापूर्वी पात्रता फेरीत उदयवीरने सहा मालिकांमध्ये ५८५ गुण मिळवत आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत चौथे स्थान मिळवले होते. भारताच्याच जोनाथन गॅविन अँटनीने केवळ क्रमवारी गुणांसाठी (आरपीओ) सहभागी होत ५८६ गुणांची नोंद केली. त्याने इटलीच्या मोन्नासह पात्रता फेरीत संयुक्तपणे सर्वोच्च गुण मिळवले.
अजेंद्रसिंग चौहान १४व्या स्थानी
अन्य भारतीयांमध्ये अजेंद्रसिंग चौहानने ५८० गुणांसह १४वे, तर ऑलिम्पिक पदकविजेता सरबजोत सिंगने ५७४ गुणांसह ३१वे स्थान मिळवले. आरपीओ गटात कुमार योगेशने ५७३ गुणांची नोंद केली. पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमधील पदकविजेता तुर्कीचा युसुफ डिकेच अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिला. त्याने १३८ गुण मिळवले. ग्रीसच्या जॉर्जिओस गॅम्पिएराकिसने चौथे, तर लात्वियाच्या एमिल्स वासरमानिसने पाचवे स्थान मिळवले.