कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर खेळाडू कॅमेरुन ग्रीनने आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू बनून इतिहास रचला. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याशी झालेल्या तीव्र चढाओढीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने ग्रीनला तब्बल २५.२० कोटी रुपयांना खरेदी केले.
कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी
Photo- X
Published on

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर खेळाडू कॅमेरुन ग्रीनने आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू बनून इतिहास रचला. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याशी झालेल्या तीव्र चढाओढीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने ग्रीनला तब्बल २५.२० कोटी रुपयांना खरेदी केले. यापूर्वी, हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर होता. त्याला आयपीएल २०२४ च्या लिलावात केकेआरने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. आयपीएल लिलावात कॅमेरुन ग्रीनला २५.२० कोटी रुपये मिळाले असले तरी, त्याला फक्त १८ कोटी रुपये मिळतील. यामागील कारण काय, जाणून घेऊया.

ग्रीनला मिळणार फक्त १८ कोटी रुपये?

ग्रीनवर २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागली असली, तरी आयपीएल २०२६ हंगामासाठी त्याचा अधिकृत पगार १८ कोटी रुपये इतकाच असेल. आयपीएलच्या नियमांनुसार, बोलीची रक्कम आणि खेळाडूंचे पगार परस्पर वेगळे आहेत. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी विदेशी खेळाडूंच्या पगारावर मर्यादा घालण्यात आली होती. याअंतर्गत, कोणत्याही विदेशी खेळाडूला लिलावात फ्रँचायझीच्या सर्वोच्च रिटेन्शन रेटपेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही. सध्या, सर्वोच्च रिटेन्शन रेट १८ कोटी रुपये आहे. ग्रीनला २५.२० कोटी रुपयांपैकी १८ कोटी रुपये ही रक्कम केकेआरकडून मिळेल. उर्वरित ७.२० कोटी रुपये बीसीसीआयच्या वेल्फेयर फंडमध्ये जमा होतील. मात्र, केकेआरच्या खिशातून २५.२० कोटी इतकीच रक्कम वजा केली जाईल.

बीसीसीआयने का लागू केला विदेशी खेळाडूंच्या पेमेंटचा नियम ?

गेल्या काही आयपीएल लिलावांमध्ये असे दिसून आले की, अनेक विदेशी खेळाडूंनी मेगा लिलावात भाग घेतला नाही आणि त्याऐवजी मिनी लिलावात भाग घेतला. कमी खेळाडू उपलब्ध असल्याने विदेशी खेळाडूंना अधिक पैसे कमविण्याची संधी मिळते. म्हणून बीसीसीआयने हा नियम लागू केल्याचे सांगितले जात आहे.

कॅमेरुन ग्रीनसाठी संघांमध्ये चढाओढ

मुंबई इंडियन्सने कॅमेरुन ग्रीनसाठी पहिली बोली २ कोटी रुपये लावली, जी ग्रीनची बेस प्राइस होती. त्यानंतर राजस्थान रॉयल्स स्पर्धेत उतरले. एकदा बोली लावल्यानंतर मुंबईने माघार घेतली. तेथून कोलकाता आणि राजस्थानने स्पर्धा केली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने २.८ कोटी रुपयांची बोली लावली. ही बोली काही सेकंदातच ८ कोटी रुपयांपर्यंत पोहचली. ज्यामुळे केकेआर आणि रॉयल्समध्ये जोरदार रस्सीखेच झाली. यानंतर, राजस्थानने १३.६० कोटी रुपयांच्या बोलीसह माघार घेतली.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने १३.८ कोटी रुपयांची बोली लावून स्पर्धेत प्रवेश केला. यानंतर, केकेआरने लगेचच बोली १८.४ कोटी रुपयांपर्यंत वाढवली. परंतु सीएसकेने बोली १८.६ कोटी रुपयांपर्यंत वाढवली. बोलीचे पेडल्स इतक्या लवकर उचलले जात होते की टेबलावरील कॅल्क्युलेटर देखील मागे राहिला. बोली २४ कोटी रुपयांच्या पुढे गेली होती, परंतु सीएसके अजूनही मागे हटण्यास तयार नव्हता. शेवटी,केकेआरने २५.२० कोटी रुपयांची ऐतिहासिक बोली लावली. सीएसकेने पराभव स्वीकारला आणि कोलकाता नाईट रायडर्सने कॅमेरुन ग्रीनला विकत घेतले.

logo
marathi.freepressjournal.in