वेलिंग्टन : चौथ्या क्रमांकावर संधी मिळाल्यापासून कॅमेरून ग्रीनने (१५५ चेंडूंत नाबाद १०३ धावा) गुरुवारी अखेर चमकदार कामगिरी केली. त्याने साकारलेल्या कारकीर्दीतील दुसऱ्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ८५ षटकांत ९ बाद २७९ धावांपर्यंत मजल मारली.
वेलिंग्टन येथे सुरू झालेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली. स्टीव्ह स्मिथ (३१) व उस्मान ख्वाजा (३३) यांनी ६३ धावांची दमदार सलामी नोंदवली. मात्र मॅट हेन्रीने (४३ धावांत ४ बळी) दुसऱ्या स्पेलमध्ये केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर कांगारूंची ४ बाद ८९ अशी स्थिती झाली. त्याला विल्यम ओरूरकी आणि स्कॉट कुगलेन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून उत्तम साथ दिली. मार्नस लबूशेन (१), ट्रेव्हिस हेड (१), ॲलेक्स कॅरी (१०) यांनी निराशा केली.
२४ वर्षीय अष्टपैलू ग्रीनने मात्र एकाकी झुंज देताना १६ चौकारांसह शतक साकारले. दिवसातील अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार लगावून त्याने शतक पूर्ण केले. मिचेल मार्शसह (४०) ग्रीनने पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली. कर्णधार पॅट कमिन्स (१६), मिचेल स्टार्क (९) तग धरू शकले नाहीत. दिवसअखेर ग्रीन १०३, तर जोश हेझलवूड शून्यावर नाबाद आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनर या मालिकेसाठी न्यूझीलंड संघासोबतच आहे. गुरुवारी त्याला बदली खेळाडू म्हणून काही काळासाठी मैदानावरही पाठवण्यात आले. तसेच राष्ट्रगीताच्या वेळी तो न्यूझीलंडच्या खेळाडूंसह मैदानात उपस्थित होता.