२० मिनिटांत विराटचा फॉर्म परत आणू शकतो ; माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा आत्मविश्वास

भारताचा माजी कर्णधार असलेल्या कोहलीचा खराब फॉर्म हा सध्या भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चित मुद्दा ठरला आहे.
२० मिनिटांत विराटचा फॉर्म परत आणू शकतो ;  माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा  आत्मविश्वास

“विराट कोहलीचे काय चुकत आहे, हे सांगण्यासाठी फक्त २० मिनिटे त्याच्यासोबत घालविण्याची गरज आहे. मला जर त्याच्यासोबत २० मिनिटे थांबण्याची संधी मिळाली, तर मी त्याला नक्कीच मदत करू शकतो. मी, फक्त २० मिनिटांत विराटचा फॉर्म परत आणू शकतो,” असा आत्मविश्वास माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केला.

भारताचा माजी कर्णधार असलेल्या कोहलीचा खराब फॉर्म हा सध्या भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चित मुद्दा ठरला आहे. गेल्या काही काळापासून कोहली क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. कधी काळी धावांचा पाऊस पाडणारा विराट सध्या एक-एक धाव जमवण्यासाठी झगडत आहे. त्यामुळे त्याच्यावर काही माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली आहे; मात्र भारताचे माजी कर्णधार गावसकर यांनी विराटला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यांनतर एका क्रीडा वाहिनीशी संवाद साधताना गावसकर म्हणाले की, ऑफ-स्टम्पच्या बाहेर जाणारे चेंडू हाताळणे, ही त्याची महत्त्वाची समस्या आहे. त्यातच म्हणजे, फॉर्ममध्ये परत येण्याच्या चिंतेने त्याच्याकडून होणाऱ्या चुकांमध्ये आणखी वाढ होत आहे.

रविवारी ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवरती झालेल्या एकदिवसीय सामन्यात कोहली अवघ्या १७ धावा करून बाद झाला. रीस टॉपलीने जोस बटलरमार्फत त्याला बाद केले. विराट ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा होता. गेल्या काही डावांमध्ये तो अनेकदा अशाच प्रकारे बाद झाला आहे. गावसकर यांनी विराटची नेमकी हीच समस्या हेरली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in