विदीत, गुकेशचे दमदार विजय; कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा

पहिल्या फेरीत चारही लढती बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या फेरीत मात्र चार लढती निकाली निघाल्या. अव्वल मानांकित फॅबिआनो कारुआना याने अझरबैजानच्या निजात अबासोव्ह याचे आव्हान परतवून लावले.
विदीत, गुकेशचे दमदार विजय; कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा

टोरांटो : भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि डी. गुकेश यांनी कँडिडेट्स बुद्धिबळ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेत दमदार विजयाची नोंद केली. विदीतने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पराभवाचा धक्का दिला. गुकेशने भारताच्याच आर. प्रज्ञानंद याच्याविरुद्ध दुसऱ्या फेरीत विजयाची नोंद केली.

पहिल्या फेरीत चारही लढती बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या फेरीत मात्र चार लढती निकाली निघाल्या. अव्वल मानांकित फॅबिआनो कारुआना याने अझरबैजानच्या निजात अबासोव्ह याचे आव्हान परतवून लावले. रशियाच्या इयान नेपोमनियाची याने फ्रान्सला फिरौझा अलीरेझा याला हरवले. दुसऱ्या फेरीअखेर विदित, कारुआना, नेपोमनियाची आणि गुकेश हे प्रत्येकी १.५ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. नाकामुरा, प्रज्ञानंद, अबासोव्ह आणि अलीरेझा संयुक्तपणे पाचव्या स्थानी असून त्यांच्या खात्यात फक्त अर्धा गुण जमा आहे.

महिलांमध्ये, भारताच्या आर. वैशाली हिला चीनच्या झोनग्यी टॅन हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. रशियाची अलेक्झांड्रा गोऱ्याचकिना युक्रेनच्या ॲॅना मुझीचूकविरुद्ध वरचढ ठरली. भारताच्या कोनेरू हम्पी हिने रशियाच्या कॅटरिना लॅगनो हिच्याविरुद्ध बरोबरी पत्करली. टॅन हिने दुसऱ्या विजयासह अग्रस्थान काबीज केले आहे.

स्पर्धेचा दुसरा दिवस विदित गुजराथीने गाजवला. नाकामुराने सुरुवातीपासूनच नव्या चाली खेळण्यास सुरुवात केली. मात्र सलग दुसऱ्यांदा काळ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या विदितने नाकामुराला उंटाचा त्याग करण्यास भाग पाडले. त्यानंतर विदितने नाकामुराच्या राजाच्या बाजुने हल्ला चढवत अवघ्या २९ चालींत उल्लेखनीय विजय मिळवला. “आजच्या कामगिरीची मी वाट पाहत होतो. माझी तयारी चांगली असताना, प्रतिस्पर्ध्याने चूक करून मला सामना जिंकण्याची संधी दिली. माझा आक्रमक खेळ विजयात महत्त्वपूर्ण ठरला,” असे विदितने विजय मिळवल्यानंतर सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in