अंकित कुमारचे शानदार शतक; ५ फलंदाज गमावून हरयाणाने जमवल्या २६३ धावा

कर्णधार अंकित कुमारच्या दमदार शतकाच्या बळावर गतविजेत्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात हरयाणाचा संघ सुस्थितीत आहे.
अंकित कुमारचे शानदार शतक; ५ फलंदाज गमावून हरयाणाने जमवल्या २६३ धावा
एक्स @BCCIdomestic
Published on

कोलकाता : कर्णधार अंकित कुमारच्या दमदार शतकाच्या बळावर गतविजेत्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात हरयाणाचा संघ सुस्थितीत आहे. रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर हरयाणाने ५ फलंदाज गमावून २६३ धावा जमवल्या आहेत. त्यांचा संघ अद्याप ५२ धावांनी पिछाडीवर आहे.

स्पर्धेत अंकितने सलग दुसरे शतक झळकावले आहे. त्याच्या १३६ धावांमुळे हरयाणाला मुंबईच्या गोलंदाजांचे आक्रमण परतावून लावता आले. तत्पूर्वी हरयाणाच्या शानदार गोलंदाजीमुळे मुंबईचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र शम्स मुलानी आणि तनुष कोटीयन यांनी मुंबईचा डाव सावरला. २७८ धावांवर ८ फलंदाज बाद येथून सामन्याचा दुसरा दिवस सुरू झाला. सर्वांच्या नजरा कोटीयनच्या खेळीकडे लागल्या होत्या. मात्र सुमित कुमारने ९७ धावांवर खेळणाऱ्या कोटीयनचा त्रिफळा उडवला. मोहित अवस्थीने (नाबाद १८ धावा) रॉयस्टॉन डायसच्या साथीने मुंबईची धावसंख्या ३०० पार नेली.

मुंबईने जवळपास पहिली ४५ मिनीटे फलंदाजी केल्यानंतर हरयाणाचा संघ फलंदाजीला आला. त्यावेळी गोलंदाजांना खेळपट्टीकडून काहीच मदत होत नव्हती. अंकित आणि सलामीवीर लक्ष्य दलाल (३४ धावा) यांनी हरयाणाला चांगली सुरुवात करून दिली. सलामीच्या या जोडीने २४ षटकांत ८७ धावांची भागीदारी रचली. लंच सेशनला काही वेळ शिल्लक असताना शार्दुल ठाकूरने लक्ष्य दलालला पायचित करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. मात्र त्याचा हरयाणाच्या कर्णधारावर काहीच परिणाम झाला नाही. त्याने २१ पैकी १६ चौकार वेगवान गोलंदाजांना मारले. कमकुवत चेंडूवर त्याने दोन्ही बाजूंना फटकेबाजी केली.

संक्षिप्त धावफलक :

मुंबई - पहिला डाव : ३१५/१० (८८.२ षटके), तनुष कोटियन ९७ धावा, शम्स मुलानी ९१ धावा, अंशुल कंबोज ३/७१, सुमित कुमार ३/८१); हरयाणा - पहिला डाव : २६३/५ (७२ षटके), (अंकित कुमार १३६ धावा, शम्स मुलानी २/५९, तनुष कोटियन २/५७).

logo
marathi.freepressjournal.in