बुमराविनाही २० बळी घेण्याची क्षमता! दुसऱ्या कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार गिलकडून भारतीय गोलंदाजांचे कौतुक

बुमराविनाही २० बळी घेण्याची क्षमता! दुसऱ्या कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार गिलकडून भारतीय गोलंदाजांचे कौतुक

जसप्रीत बुमरासारख्या तारांकित खेळाडूच्या अनुपस्थितीत आपले गोलंदाज दोन्ही डावांत मिळून २० बळी घेऊ शकेल की नाही, याविषयी अनेकांनी शंका उपस्थित केली. मात्र बुमराविनाही आम्ही २० बळी मिळवू शकतो, असा विश्वास मला होता. त्यामुळेच विजयाचे श्रेय गोलंदाजांना देणे गरजेचे आहे, असे मत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने व्यक्त केले.
Published on

बर्मिंगहॅम : जसप्रीत बुमरासारख्या तारांकित खेळाडूच्या अनुपस्थितीत आपले गोलंदाज दोन्ही डावांत मिळून २० बळी घेऊ शकेल की नाही, याविषयी अनेकांनी शंका उपस्थित केली. मात्र बुमराविनाही आम्ही २० बळी मिळवू शकतो, असा विश्वास मला होता. त्यामुळेच विजयाचे श्रेय गोलंदाजांना देणे गरजेचे आहे, असे मत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने व्यक्त केले.

२५ वर्षीय गिलच्या नेतृत्वात भारताने रविवारी बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला ३३६ धावांनी धूळ चारली. या विजयासह भारताने पाच लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मुख्य म्हणजे भारताने एजबॅस्टन येथे प्रथमच एखादी कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वीच्या एजबॅस्टनवरील ८ कसोटींपैकी ७ लढतींमध्ये भारताचा पराभव झालेला, तर एक लढत अनिर्णित राहिली होती. त्यामुळे यंदाचा विजय संस्मरणीय आणि ऐतिहासिक आहे. आकाश दीप (सामन्यात १० बळी) व मोहम्मद सिराज (सामन्यात ७ बळी) या वेगवान जोडीने दोन्ही डावांत चमकदार कामगिरी केली.

त्यामुळे पहिल्या डावात २६९ व दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी साकारणाऱ्या कर्णधार गिल सामनावीर पुरस्कार देण्यात आला असला, तरी स्वत: गिलनेच गोलंदाजांना विजयाचे श्रेय दिले आहे. “खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांच्या प्रेमात होती. त्यामुळे अशा खेळपट्टीवर गोलंदाजांनी २ वेळा विरोधी संघाचे १० बळी मिळवणे खरंच कौतुकास्पद आहे. जेव्हा दुसऱ्या कसोटीसाठी बुमराला विश्रांती देण्यात आली, त्यावेळी अनेकांनी संघातील गोलंदाजांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आपण त्यांचे २० बळी घेऊ शकतो का, असेही विचारले. मात्र मला आणि संघातील प्रत्येकाला गोलंदाजांवर विश्वास होता,” असे गिल म्हणाला.

“बुमरासारखा गोलंदाज प्रत्येक लढत खेळावा, असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे. मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतात. बुमरा सीमारेषेबाहेरून तसेच ड्रेसिंग रूममध्ये एका लीडरप्रमाणे सातत्याने माझ्याशी व गोलंदाजांशी संवाद साधत होता. त्याच्या अनुपस्थितीतही आपल्या वेगवान गोलंदाजांनी १६-१७ विकेट्स घेऊन दाखवल्या. उर्वरित काम फिरकीपटूंनी केले. आपले गोलंदाज कोणत्याही वातावरणात २० बळी घेऊ शकतात,” असेही गिलने नमूद केले. त्याशिवाय १० जुलैपासून लॉर्ड्स स्टेडियमवर रंगणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी बुमरा परतणार असल्याचे गिलने अखेरीस सांगितले. त्यामुळे या कसोटीची आता उत्सुकता आहे.

ड्युक्स चेंडूच्या दर्जावर गिल असमाधानी

इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी ड्युक्स कंपनीचे चेंडू वापरण्यात येतात. यावर गिलने नाराजी दर्शवली आहे. “पहिल्या दोन्ही सामन्यांत खेळपट्ट्या फलंदाजांसाठी पोषक होत्या. त्यात चेंडूही फारसा स्विंग झाला नाही. अनेकदा त्याची दशा इतकी खराब झाली की बदलण्यावाचून पर्याय उरला नाही. पहिल्या २० ते २५ षटकांनंतर चेंडूला उसळीसुद्धा मिळत नव्हती. मग दुसरा नवा चेंडू येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागायची. अशाने गोलंदाजांसाठी सामन्यात काहीच उरत नाही,” असे गिल म्हणाला. तिसऱ्या कसोटीत खेळपट्टी इतकी सपाट नसेल. गोलंदाजांना तेथे सहाय्य लाभेल, असे अपेक्षित असल्याचेही गिलने नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in