कर्णधार के. एल. राहुलच्या फिटनेसवर सर्वांचे लक्ष;वन-डे मालिकेसाठी टीम इंडिया कसून सराव करणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाच्या प्रस्थानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता
कर्णधार के. एल. राहुलच्या फिटनेसवर सर्वांचे लक्ष;वन-डे मालिकेसाठी टीम इंडिया कसून सराव करणार

भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेला पोहोचला असून आता तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कसून सराव करणार आहे. कर्णधार के. एल. राहुलच्या फिटनेसवर सर्वांचे लक्ष असणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाचा हरारे विमानतळावर पोहोचल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. भारतीय संघ १८, २० आणि २२ ऑगस्ट रोजी झिम्बाब्वेमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाच्या प्रस्थानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. टीम इंडिया शनिवारी सकाळी झिम्बाब्वेला रवाना झाली. संघाला तेथे तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.

या मालिकेसाठी संघाचे कर्णधारपद राहुलकडे सोपविण्यात आले आहे. राहुलची यापूर्वी निवड झाली नव्हती. तो तंदुरुस्त झाल्यानंतर त्याची निवड करण्यात आली आहे. धवनचे कर्णधारपद काढून ते राहुलकडेच सोपविण्यात आले आहे. आता धवन उपकर्णधार राहील. अशा स्थितीत आशिया कपपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी राहुलकडे आहे. त्यामुळे राहुलचा फिटनेस आणि त्याची कामगिरी याबाबत सर्वजण लक्ष ठेवून आहेत. या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत यांच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक म्हणून संघासोबत गेले आहेत. संघाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांना या आठवड्यात आशिया कपसाठी यूएईला जायचे आहे. त्यामुळे त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात सहभागी असलेले राहुल आणि दीपक हुडा यांनाच केवळ आशिया कपसाठी संघात स्थान मिळाले आहे. अशा स्थितीत दीपक आणि राहुलची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. झिम्बाब्वे दौरा आटोपल्यानंतर दोन्ही खेळाडू थेट यूएईला रवाना होतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झिम्बाब्वेला पोहोचलेली टीम इंडिया व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in