अल्कराझ दुसऱ्यांदा अमेरिकन सम्राट! इटलीच्या सिनरला नमवले; जागतिक क्रमवारीतही अग्रस्थानी झेप

"माझ्या कुटुंबीयांपेक्षा मी गेल्या काही महिन्यांत सिनरलाच सातत्याने पाहत आहे. यावरूनच आम्हा दोघांमध्ये...
अल्कराझ दुसऱ्यांदा अमेरिकन सम्राट! इटलीच्या सिनरला नमवले; जागतिक क्रमवारीतही अग्रस्थानी झेप
PC : US Open/x
Published on

न्यूयॉर्क : स्पेनच्या २२ वर्षीय कार्लोस अल्कराझने रविवारी मध्यरात्री अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद काबिज केले. त्याने इटलीचा गतविजेता यानिक सिनरला धूळ चारून एकंदर दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासह जागतिक क्रमवारीतसुद्धा पुन्हा एकदा अग्रस्थान प्राप्त केले. त्यामुळे अल्कराझच टेनिस विश्वातील नवा सम्राट असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून यूएस ओपनला ओळखले जाते. हार्ड कोर्टवर खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेला अन्य ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या तुलनेत तितकेच महत्त्व असते. २०२४मध्ये पुरुष एकेरीत सिनर, तर महिलांमध्ये बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने विजेतेपद मिळवले होते. त्यापैकी सबालेंकाने यंदाही महिलांमध्ये बाजी मारली. मात्र पुरुषांमध्ये अल्कराझने सिनरचे वर्चस्व मोडीत काढून २०२२नंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकली.

आर्थर ॲश स्टेडियमवर झालेल्या या महाअंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित अल्कराझने अग्रमानांकित सिनरचा ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा पराभव केला. २ तास आणि ४२ मिनिटांच्या या लढतीत प्रामुख्याने अल्कराझनेच २४ वर्षीय सिनरवर दबदबा राखला. मुख्य म्हणजे यंदाच्या वर्षात सलग तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत हे दोन्ही खेळाडू आमनेसामने आले. जूनमध्ये फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत अल्कराझने बाजी मारली, तर जुलैमध्ये विम्बल्डनला सिनरने अल्कराझवर विजय मिळवला होता. मात्र अमेरिकन ओपनच्या जेतेपदाद्वारे अल्कराझने वर्षाचा शेवटही गोड केला.

अल्कराझचे हे एकंदर सहावे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. त्याने प्रत्येकी दोन वेळा फ्रेंच ओपन (२०२४, २०२५), विम्बल्डन (२०२३, २०२४) व अमेरिकन (२०२२, २०२५) स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्यामुळे आता अल्कराझला फक्त ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद खुणावत आहे. दरम्यान, महाअंतिम लढतीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. या लढतीसह वर्षातील चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा संपन्न झाल्या. आता २०२६मध्ये पुढील ग्रँडस्लॅम स्पर्धा होईल.

सिनर-अल्कराझचे क्लीन स्वीप

२०२४ व २०२५ या दोन वर्षांत झालेल्या आठ ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये सिनर किंवा अल्कराझपैकीच एकाने जेतेपद मिळवलेले आहे. यापूर्वी २०२३च्या अमेरिकन ओपनमध्ये जोकोव्हिचने कारकीर्दीतील २४वे ग्रँडस्लॅम जिंकले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत त्याला एकही जेतेपद मिळवता आलेले नाही. कारण अल्कराझ व सिनर यांनी पूर्ण वर्चस्व राखलेले आहे. सिनरने २०२४मध्ये ऑस्ट्रेलियन व अमेरिकन, तर अल्कराझने फ्रेंच व विम्बल्डन स्पर्धा जिंकली. मग २०२५मध्ये सिनरने ऑस्ट्रेलियन व विम्बल्डन, तर अल्कराझने फ्रेंच व अमेरिकन स्पर्धा जिंकली. आता जानेवारी २०२६मध्ये सिनरला सलग तिसरे ऑस्ट्रेलियन जेतेपद मिळवण्याची संधी आहे. मात्र अल्कराझ नक्कीच त्याच्या मार्गात अडथळा ठरू शकतो.

अल्कराझची ग्रँडस्लॅम जेतेपदे

-अमेरिकन ओपन : २०२२, २०२५

-फ्रेंच ओपन : २०२४, २०२५

-विम्बल्डन : २०२३, २०२४

"माझ्या कुटुंबीयांपेक्षा मी गेल्या काही महिन्यांत सिनरलाच सातत्याने पाहत आहे. यावरूनच आम्हा दोघांमध्ये स्पर्धा किती वाढली आहे, हे स्पष्ट होते. मला माझ्या खेळावर विश्वास आहे. दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकणे समाधानकारक आहे. या यशामागे संपूर्ण चमूचे मोलाचे योगदान आहे. मात्र अद्याप मला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकता आलेली नाही. त्यामुळे त्यासाठी आणखी परिश्रम घेईन." - कार्लोस अल्कराझ

logo
marathi.freepressjournal.in