रत्नागिरी कॅरम लीगच्या पाचव्या पर्वात कॅरम लव्हर्स संघाने पटकावले विजेतेपद

पहिल्या लढतीत कॅरम लव्हर्सच्या मोहम्मद अरिफने अहमद अलीवर २०-२२, २५-१, २५-६ अशी पिछाडीवरून सरशी साधली
रत्नागिरी कॅरम लीगच्या पाचव्या पर्वात कॅरम लव्हर्स संघाने पटकावले विजेतेपद

रत्नागिरीच्या विवेक हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या रत्नागिरी कॅरम लीगच्या पाचव्या पर्वात कॅरम लव्हर्स संघाने जेतेपद मिळवले. भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंफिगो, ओएनजीसी व क्रिस्टल पुरस्कृत या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कॅरम लव्हर्सने सत्यशोधक स्ट्रायकर्स संघावर २-१ अशी मात केली.

अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत कॅरम लव्हर्सच्या मोहम्मद अरिफने अहमद अलीवर २०-२२, २५-१, २५-६ अशी पिछाडीवरून सरशी साधली. दुसऱ्या सामन्यात के. श्रीनिवासनने योगेश परदेशीवर २५-८, २५-४ असे सरळ दोन सेटमध्ये वर्चस्व गाजवून संघाला २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. दुहेरीच्या लढतीत सत्यशोधक संघाच्या मोहम्मद घुफ्रान व एल. सूर्यप्रकाश जोडीने अभिषेक चव्हाण व राहुल सोळंकी यांच्यावर ४-२५, २४-१९, २५-२० असा विजय मिळवूनही त्यांना पहिल्या दोन लढती गमावल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

विजेत्या संघाला १ लाख ७५ हजार, तर उपविजेत्या संघाला १ लाख ५० हजारांचे रोख पारितोषिक तसेच चषक देऊन गौरवण्यात आले. लायबा कॅरम मास्टर्सने तिसरे स्थान पटकावले. मोहम्मद अरिफ हा लीगमधील सर्वोत्तम खेळाडू ठरल्याने त्यालाही रोख पारितोषिक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय स्पर्धेत व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅमद्वारे विजय नोंदवणाऱ्या खेळाडूंनाही रोख रकमेसह गौरवण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in