सुवर्णपदक विजेत्या ॲथलिट्सना रोख पारितोषिक: पॅरिस ऑलिम्पिकपासून सुरू होणार नवा नियम

२०२१च्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले होते. तेव्हापासून भारतात ॲथलेटिक्स क्रीडा प्रकाराचे चाहतेही वाढले आहेत. २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला प्रारंभ होणार असून यासाठी एव्हाना सर्व खेळाडू तयारीस लागले आहेत. या ऑलिम्पिकमध्ये ४८ प्रकारांतील सर्व सुवर्णपदक विजेत्यांना रोख पारितोषिकाने गौरविण्यात येईल.
सुवर्णपदक विजेत्या ॲथलिट्सना रोख पारितोषिक: पॅरिस ऑलिम्पिकपासून सुरू होणार नवा नियम
Published on

नवी दिल्ली : आगामी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपासून ॲथलेटिक्सच्या ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिकही देण्याचा उत्तम निर्णय जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने घेतला आहे. त्यानुसार आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्याला ५० हजार डॉलर (४१ लाख, ६० हजार) देण्यात येतील. ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्याला रोख पारितोषिक देणारी जागतिक ॲथलेटिक्स ही पहिलीच संघटना ठरली आहे.

२०२१च्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले होते. तेव्हापासून भारतात ॲथलेटिक्स क्रीडा प्रकाराचे चाहतेही वाढले आहेत. २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला प्रारंभ होणार असून यासाठी एव्हाना सर्व खेळाडू तयारीस लागले आहेत. या ऑलिम्पिकमध्ये ४८ प्रकारांतील सर्व सुवर्णपदक विजेत्यांना रोख पारितोषिकाने गौरविण्यात येईल. यासाठी ट्रॅक अँड फिल्डच्या संघटनेने २४ लाख डॉलर इतकी रक्कम बाजूला काढली आहे. त्याशिवाय २०२८मध्ये लॉस एंजेलिस येथे रंगणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य व कांस्यपदक विजेत्यांनाही रोख पारितोषिकाद्वारे सन्मानित करण्यात येईल.

“ऑलिम्पिक खेळांसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून (आयओसी) जागतिक ॲथलेटिक्स संघटनेला निधी दिला जातो. आम्ही हाच निधी थेट आमच्या खेळाडूंसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना रोख पारितोषिक मिळाल्यास ते आणखी मेहनत घेतील. यामुळे आपोआपच त्यांच्या देशाची पदकसंख्या उंचावेल,” असे जागतिक संघटनेचे अध्यक्ष सबेस्टियन को यांनी सांगितले.

२६ वर्षीय नीरज सध्या टर्की येथे ऑलिम्पिकची तयारी करत आहे. मे महिन्यात तो डायमंड लीगच्या पहिल्या टप्प्यात सहभागी होणार आहे. त्यानंतर १८ जून रोजी फिनलँड येथे पावो नोर्मी गेम्समध्येही नीरज खेळणार आहे. यानंतर तो ऑलिम्पिकसाठी पॅरिसला दाखल होईल, असे समजते.

logo
marathi.freepressjournal.in