मुंबईकरांसाठी पर्वणी! भारत वि. न्यूझीलंड कसोटीचा आनंद लुटा कमी किमतीत

वानखेडे स्टेडियमवर १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनने कमी किमतीत हा सामना पाहण्याची पर्वणी क्रिकेटप्रेमींना दिली आहे.
मुंबईकरांसाठी पर्वणी! भारत वि. न्यूझीलंड कसोटीचा आनंद लुटा कमी किमतीत
BCCI
Published on

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनने कमी किमतीत हा सामना पाहण्याची पर्वणी क्रिकेटप्रेमींना दिली आहे. या सामन्यासाठीची तिकिटे पूर्वीसारखीच असतील, असे एमसीएने शनिवारी स्पष्ट केले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना रंगला होता. त्यावेळी भारताने ३७२ धावांनी न्यूझीलंडचा दारुण पराभव केला होता. या सामन्यात न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाझ पटेल याने एका डावात १० विकेट्स टिपण्याची करामत केली होती. अशी किमया करणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला होता. तीन वर्षांपूर्वी एमसीने तिकीटदरात २५ टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे दिवसाला १०० रुपयांना मिळणारे तिकीट १२५ रुपयांवर गेले होते. तर पाच दिवसांसाठीचे ३०० रुपये असणारे तिकीट ३७५ रुपयांवर पोहोचले होते. मात्र यावेळी एमसीएने तिकीटदरात कोणतीही वाढ न करता पूर्वीसारखेच तिकीटदर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला पुढील वर्षी १९ जानेवारी रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने एमसीएने बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. एमसीएच्या १४, १९ आणि १९ वर्षांखालील मुले तसेच १५, १९ आणि २३ वर्षांखालील महिला संघात निवडल्या गेलेल्या सर्व खेळाडूंना प्रथम श्रेणी प्रवासाचा पास आणि प्रवास भत्ता दिला जाणार आहे. तसेच एमसीएच्या खेळाडूंसाठी करिअर मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यात विविध कॉर्पोरेट कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत भेट घेण्याची संधी माजी आणि विद्यमान भारतीय खेळाडूंना मिळणार आहे.

"एमसीएच्या खेळाडूंना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा यामागचा प्राथमिक उद्देश आहे," असे एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले. त्याचबरोबर खेळाडूंना लागणारे क्रिकेट साहित्य थेट उत्पादकाकडून वाजवी किंमतीत उपलब्ध करून दिले जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवर विठ्ठल दिवेचा पॅव्हेलियनमध्ये वातानुकूलित कक्ष तयार करण्यात येणार आहे. तसेच एमसीएशी संलग्न क्लब्स तसेच शाळा आणि महाविद्यालयीन क्लब्सना एमसीएकडून अनुदान दिले जाणार आहे. डॉ. एच. डी. कांगा लीगच्या पुरस्कारांचे वितरण २५ ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in