सोलापूरच्या अर्शीनचे शतक; भारताचा सलग तिसरा विजय

भारताने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अमेरिकेचा २०१ धावांनी फडशा पाडून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
सोलापूरच्या अर्शीनचे शतक; भारताचा सलग तिसरा विजय

ब्लोमफोंटेन : सोलापूरच्या १८ वर्षीय अर्शीन कुलकर्णीने ११८ चेंडूंत १०८ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अमेरिकेचा २०१ धावांनी फडशा पाडून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. याबरोबरच भारताने अ-गटात अग्रस्थान मिळवून थाटात ‘सुपर-सिक्स’ फेरी गाठली. आता मंगळवारी त्यांची न्यूझीलंडशी गाठ पडेल.

गतविजेत्या भारताने गटातील अखेरच्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद ३२६ धावांचा डोंगर उभारला. पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या सलामीवीर अर्शीनने यावेळी आपले कौशल्य दाखवताना ८ चौकार व ३ षटकारांसह शतक झळकावले. त्याला मुंबईकर मुशीर खानच्या (७३) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. तसेच कर्णधार उदय सहारन (३५) व प्रियांशू मोलिया (नाबाद २७) यांनीही मोलाचे योगदान दिले. त्यामुळे भारताने ३०० धावांचा पल्ला गाठला.

लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेला ५० षटकांत ८ बाद १२५ धावाच करता आल्या. उत्कर्ष श्रीवास्तवने त्यांच्याकडून सर्वाधिक ४० धावा केल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारीने चार बळी मिळवले. भारताने पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे बांगलादेश व आयर्लंडला नामोहरम केले होते.

सुपर-सिक्सचे गणित

  • आता ‘सुपर-सिक्स’ फेरीत भारताची न्यूझीलंडनंतर २ फेब्रुवारीला नेपाळशी गाठ पडेल. या फेरीत साखळी लढतींच्या विजयांचे गुणही ग्राह्य धरले जाणार आहेत.

  • सुपर-सिक्स फेरीच्या अखेरीस दोन्ही गटांतून आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारत-पाकिस्तान हे आपापल्या अ व ड गटात अग्रस्थानी होते. त्यामुळे ते सुपर-सिक्समध्ये एकाच गटात असूनही आमनेसामने येणार नाहीत.

  • दुसऱ्या गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिजा, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in