सूर्याचा शतकी प्रहार

आफ्रिकेचा कर्णधार एडीन मार्करमने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र यशस्वी जैस्वाल (४१ चेंडूंत ६०) व सूर्यकुमार या मुंबईकरांनी जोरदार आक्रमण केले.
सूर्याचा शतकी प्रहार
PM

जोहान्सबर्ग : जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर गुरुवारी सूर्य तळपला. कर्णधार सूर्यकुमार यादवने अवघ्या ५६ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांच्या आतषबाजीसह साकारलेल्या घणाघाती १०० धावांच्या खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ७ बाद २०१ धावांचा डोंगर रचला. सूर्यकुमारचे हे टी-२० कारकीर्दीतील चौथे शतक ठरले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत तो रोहित शर्मा व ग्लेन मॅक्सवेलसह संयुक्तपणे अग्रस्थानी आहे.

आफ्रिकेचा कर्णधार एडीन मार्करमने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र यशस्वी जैस्वाल (४१ चेंडूंत ६०) व सूर्यकुमार या मुंबईकरांनी जोरदार आक्रमण केले. शुभमन गिल (८), तिलक वर्मा (०) तिसऱ्याच षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर लागोपाठच्या चेंडूवर माघारी परतले. २ बाद २९वरून यशस्वी व सूर्यकुमारने तिसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी रचली. यशस्वी बाद झाल्यानंतरही सूर्यकुमारने प्रहार सुरू ठेवला. ३२ चेंडूंत अर्धशतक व नंतर ५५ चेंडूंतच त्याने शतकाची वेस ओलांडली. त्यामुळे भारताने २०० धावांचा पल्ला गाठला.

१-सूर्यकुमार हा आफ्रिकेत शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

logo
marathi.freepressjournal.in