

नवी दिल्ली: दिल्ली कॅपिटल्सने आगामी आयपीएल हंगामापूर्वी आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करत श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास याची वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. मागील दोन हंगामांत संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या मुनाफ पटेलच्या जागी वास जबाबदारी सांभाळणार आहे.
श्रीलंकेच्या सर्वाधिक यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या चामिंडा वासने १११ कसोटी सामन्यांत ३५५, तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० बळी घेतले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने वासचे स्वागत करताना म्हटले की, "विश्वचषक विजेता आणि श्रीलंकेचा आजवरचा सर्वोत्तम गोलंदाज. टायगर टेरिटरीमध्ये तुमचे स्वागत आहे, प्रशिक्षक !"
मुख्य प्रशिक्षक सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षक स्टाफमध्ये वासचा समावेश झाला आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याची यापूर्वीच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वासची प्रशिक्षणाची कारकीर्द
चामिंडा वासने श्रीलंकेच्या पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी तीन वेगवेगळ्या टप्प्यांत सांभाळली आहे. न्यूझीलंड संघासोबत अल्पकालीन कराराने त्याच्या प्रशिक्षक कारकीर्दीची सुरुवात झाली.
त्यानंतर २०१३ ते २०१५ या काळात त्याने श्रीलंकेच्या संघाला प्रशिक्षण दिले. २०१६ मध्ये टी-२० विश्वचषकासाठी त्याची आयर्लंडच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. त्यानंतर पुन्हा श्रीलंकेच्या संघात त्याने प्रशिक्षक म्हणून काम केले. आयपीएलमध्ये वासने खेळाडू म्हणून २००८ ते २०१० या पहिल्या तीन हंगामांत पूर्वीच्या डेक्कन चार्जर्स संघाकडून प्रतिनिधित्व केले होते.