एकाच मैदानात खेळण्याचा भारताला लाभ!रोहितच्या शिलेदारांना जेतेपदाची सर्वोत्तम संधी; ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सचे स्पष्ट मत

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत सर्व सामने दुबईतील एकाच मैदानात खेळत आहे.
एकाच मैदानात खेळण्याचा भारताला लाभ!रोहितच्या शिलेदारांना जेतेपदाची सर्वोत्तम संधी; ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सचे स्पष्ट मत
Published on

सिडनी : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत सर्व सामने दुबईतील एकाच मैदानात खेळत आहे. त्यामुळे त्यांना खेळपट्टी आणि तेथील वातावरणाशी जुळवून घेणे सोपे असून याचाच लाभ उचलून ते यंदा जेतेपद मिळवू शकतात, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने व्यक्त केले. दुखापतीमुळे कमिन्स या स्पर्धेत सहभागी झालेला नाही. स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे.

पाकिस्तानमध्ये १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू झाली. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळत आहे. बीसीसीआय व पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) यांचा आयसीसीशी झालेल्या करारानुसार भारतीय संघ पाकिस्तानमधील आयसीसी स्पर्धेसाठी तेथे जाणार नाही. त्याचप्रमाणे आता भविष्यात पाकिस्तानचा संघही भारतातील आयसीसी स्पर्धेसाठी भारतात न येता दुबईत खेळणार. एकीकडे अन्य संघांना पाकिस्तानमधील लाहोर, रावळपिंडी, कराची अशा तीन विविध शहरांत सामने खेळण्यासाठी प्रवास करावा लागत आहे. तसेच भारताशी लढत असल्यास त्यांना दुबईलाही जावे लागेल. मात्र भारतीय संघ दुबईतच वास्तव्यास असल्याने त्यांना फारशी समस्या नाही. याकडेच कमिन्सने लक्ष वेधले.

“भारत-पाकिस्तान आणि आयसीसीशी करार झाला व स्पर्धा सुरळीतपणे सुरू झाली, हे चांगली बाब आहे. मात्र यामुळे भारतीय संघाला अन्य संघांच्या तुलनेत अतिरिक्त लाभ मिळत आहे. भारताचा संघ कागदावर सर्वोत्तम दिसत आहे. तसेच एकाच मैदानात सर्व सामने खेळत असल्याने ते या गोष्टीचा लाभ उचलून जेतेपद मिळवू शकतात. त्यांना जेतेपदाची उत्तम संधी आहे,” असे कमिन्सने एका ऑस्ट्रेलियन यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मात्र याव्यतिरिक्त कमिन्सने अन्य कोणतेही वादग्रस्त विधान करणे टाळले.

“सध्या मी दुखापतीतून पूर्णपणे सावरलेलो नाही. मात्र मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गोलंदाजीच्या सरावास प्रारंभ करेन,” असेही कमिन्सने नमूद केले. कमिन्सला गुडघ्याच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावे लागले. आयपीएलमध्ये तो सनरायजर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करताना दिसेल. कमिन्सची पत्नी बेकी हिने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दुसऱ्या अपत्याला जन्म दिला.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने सध्या उपांत्य फेरी गाठली आहे. अ-गटात भारतीय संघ सलग दोन विजयांसह दुसऱ्या स्थानी आहे. आता २ मार्च रोजी भारताची न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. भारताने अनुक्रमे बांगलादेश व पाकिस्तान या संघांना धूळ चारली आहे, तर न्यूझीलंडनेही या दोन संघांना पराभूत करून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा फक्त गटातील क्रम ठरणे बाकी आहे.

विराटने सचिनचा ‘तो’ विक्रमसुद्धा मोडावा : पाँटिंग

एकदिवसीय प्रकारात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या शतकांचा विक्रम मागेच मोडला. आता पुढील २-३ वर्षे खेळून त्याने सचिनच्या धावांचाही विक्रम मोडावा, अशी इच्छा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केली आहे. “विराट हा एकदिवसीय प्रकारातील आजवरचा सर्वोत्तम फलंदाज आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. आता एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट तिसऱ्या स्थानी आहे. फक्त कुमार संगकारा व सचिन विराटपुढे आहेत. तंदुरुस्ती ‌विराटकडे आहेच. फक्त पुढील ३ वर्षे तो याच लयीत खेळला, तर सचिनच्या एकदिवसीय प्रकारातील धावांचा विक्रमही मोडू शकतो,” असे पाँटिंग म्हणाला. विराटच्या सध्या १४,०८५ धावा आहेत, तर निवृत्त झालेल्या सचिनच्या १८,४२६ व संगकाराच्या १४,२३४ धावा आहेत.

आपला ब-संघही पाकिस्तानपेक्षा सरस : गावस्कर

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा संघ पाठवला असता, तरी त्यांनीही पाकिस्तानला नमवले असते, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली. भारताने रविवारी पाकिस्तानचा धुव्वा उडवून थाटात उपांत्य फेरी गाठली व पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. “भारताने पाकिस्तानविरुद्ध ब-संघ म्हणजेच दुसऱ्या फळीतील खेळाडू उतरवले, तरी तेसुद्धा त्यांना नमवतील. भारतीय क्रिकेटपटूंचा दर्जा तितका वरचा आहे. कदाचित भारताच्या क-संघाला काहीसा संघर्ष करावा लागू शकतो. मात्र पाकिस्तानमध्ये तिसऱ्या तर सोडा, दुसऱ्या फळीतील खेळाडूही तयार नाहीत, असे दिसते. अपयशी ठरूनही सातत्याने त्याच त्याच पसंतीच्या खेळाडूंना पाकिस्तान प्राधान्य देते. त्यामुळे त्यांच्यावर अशी पराभवाची नामुष्की ओढवते,” असे गावस्कर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in