
दुबई : अखेर २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील जिव्हारी लागलेल्या पराभवाचा भारताने वचपा घेतला. विराट कोहलीने (९८ चेंडूंत ८४ धावा) साकारलेल्या झुंजार अर्धशतकाला अन्य फलंदाज तसेच गोलंदाजांची सुरेख साथ लाभली. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४ गडी आणि ११ चेंडू राखून धूळ चारली. याबरोबरच भारताने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली.
दुबईच्या रणांगणात म्हणजेच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या पहिल्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने दिलेले २६५ धावांचे लक्ष्य भारताने ४८.१ षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. विराटने ५ चौकारांसह ९८ चेंडूंत ८४ धावा करताना एकदिवसीय कारकीर्दीतील ७४वे अर्धशतक झळकावले. मुंबईकर श्रेयस अय्यर (६२ चेंडूंत ४५) व के. एल. राहुल (३४ चेंडूंत नाबाद ४२) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यामुळे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात ऑस्ट्रेलियावर तिसऱ्यांदा मात केली. आता रविवारी दुबईतच होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतापुढे दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडचे आव्हान असेल. भारताने यापूर्वी २००२ व २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावलेली आहे. तसेच भारताने एकंदर पाचव्यांदा (२०००, २००२, २०१३, २०१७) अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.
१९ फेब्रुवारीपासून ८ संघांत सुरू झालेले चॅम्पियन्स ट्रॉफीचे नववे पर्व आता उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असला तरी आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळत आहे. अ-गटातून अग्रस्थानासह उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताने साखळीत विजयी हॅटट्रिक साकारली. प्रथम बांगलादेश व नंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भारताने धूळ चारली. रविवारी न्यूझीलंड संघाविरुद्ध फिरकीच्या बळावर भारताने २४९ धावांचा यशस्वी बचाव केला. त्यामुळे उपांत्य सामन्यातही भारताचेच पारडे जड मानले जात होते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने ब-गटातून दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियानेच अंतिम फेरीत भारताला पराभूत करून कोट्यवधी चाहत्यांचा अपेक्षाभंग केला होता. त्या पराभवाचा भारताने एकप्रकारे वचपा घेतला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. संघात एकही बदल न केलेल्या भारताने पहिल्या षटकापासूनच कांगारूंवर दडपण ठेवले. मोहम्मद शमीने सुरुवातीलाच ट्रेव्हिस हेडचा झेल सोडल्यामुळे अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली. मात्र तिसऱ्या षटकात शमीने कूपर कोनोलीला शून्यावर माघारी पाठवले. हेड दुसऱ्या बाजूने आक्रमण करत होता. त्याने ३३ चेंडूंत ३९ धावा केल्या असताना नवव्या षटकात रोहितने जादुई फिरकीपटू वरुण चक्रवर्तीकडे चेंडू सोपवला. वरुणने दुसऱ्याच चेंडूवर हेडला बाद केल्यामुळे भारतीयांनी एकच जल्लोष केला.
त्यानंतर स्मिथ व मार्नस लबूशेन यांची जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली. मात्र रवींद्र जडेजाने लबूशेनला २९ धावांवर पायचीत पकडले. त्यानेच जोश इंग्लिसलाही (११) माघारी पाठवले. स्मिथने मात्र एक बाजू सांभाळताना ४ चौकार व १ षटकारासह एकदिवसीय कारकीर्दीतील ३५वे अर्धशतक साकारले. त्याने ॲलेक्स कॅरीसह पाचव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. ही जोडी भारतासाठी घातक ठरत असतानाच ३७व्या षटकात शमीने स्मिथचा ७३ धावांवर त्रिफळा उडवला.
४ बाद १९८ वरून मग ऑस्ट्रेलियाचा डाव काहीसा घसरला व धावगतीही मंदावली. ग्लेन मॅक्सवेलला अक्षर पटेलने त्रिफळाचीत केले. तर गोलंदाजही फार काळ तग धरू शकले नाहीत. मात्र कॅरीने ८ चौकार व १ षटकारांसह अर्धशतक झळकावून कांगारूंनी २५० धावांपलीकडे नेले. ४८व्या षटकात श्रेयसने थेट थ्रो करून कॅरीला ६१ धावांवर धावचीत केले. मग हार्दिक पंड्याने झाम्पाचा त्रिफळा उडवून ऑस्ट्रेलियाचा डा ४९.३ षटकांत २६४ धावांत संपुष्टात आणला. भारतासाठी शमीने ३ बळी मिळवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल (८) पाचव्याच षटकात त्रिफळाचीत झाला. कर्णधार रोहितने ३ चौकार व १ षटकारासह झटपट २८ धावा केल्या. मात्र फिरकीपटू कोनोलीने रोहितला पायचीत पकडून भारताची २ बाद ४३ अशी स्थिती केली. तेथून मग विराट आणि श्रेयस यांची जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. विराटने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक साकारले. श्रेयस मात्र ४५ धावांवर झाम्पाचा शिकार ठरला. त्यामुळे त्याचे तिसरे अर्धशतक हुकले. पाचव्या क्रमांकावरील अक्षरने २७ धावांचे योगदान देत भारताला विजयासमीप नेले.
नॅथन एलिसने अक्षरचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. तर ४३व्या षटकात झाम्पाच्या गोलंदाजीवर विराट बाद झाला. विराटला ५२व्या शतकाने १६ धावांनी हुलकावणी दिली. मात्र त्यानंतर राहुल व हार्दिक यांनी फटकेबाजी करत भारताला विजयाची दिशा दाखवली. हार्दिक २४ चेंडूंत २८ धावा काढून बाद झाला. राहुलने मात्र २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४२ धावा फटकावल्या. अखेर ४९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर राहुलनेच षटकार लगावून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. जडेजा २ धावांवर नाबाद राहिला.
हे आकडे चुकवू नका!
५ भारताने एकंदर पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी २०००, २००२, २०१३, २०१७मध्ये भारताने अशी कामगिरी केली होती. त्यांपैकी २००२ व २०१३मध्ये भारताने जेतेपद मिळवले, तर २००० व २०१७मध्ये त्यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला.
१ रोहित हा आयसीसीच्या सर्व स्पर्धांची अंतिम फेरी गाठणारा पहिलाच कर्णधार ठरला. रोहितच्या नेतृत्वात भारताने २०२३चा एकदिवसीय विश्वचषक, २०२३ची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, २०२४चा टी-२० विश्वचषक व २०२०५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली.
१ वरुण हा ट्रेव्हिड हेडला एकदिवसीय सामन्यातील पहिल्याच १० षटकांत बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
१६१ विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील झेलांची संख्या १६१ झाली आहे. त्याने मंगळवारी दोन झेल घेत रिकी पाँटिगला (१६०) मागे टाकले. आता फक्त महेला जयवर्धने (२१८) विराटच्या पुढे आहे.
२४ विराटने आयसीसीच्या ५० षटकांच्या स्पर्धेत (एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी) २४ वेळा ५०हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकरने आयसीसी स्पर्धांमधील ६१ सामन्यांपैकी २३ वेळा ५०हून अधिक धावा केल्या होत्या. तर विराटने ५४ सामन्यांतच २४ वेळा हा पराक्रम केला.
१४ भारताने गेल्या १४ एकदिवसीय सामन्यांत नाणेफेक गमावली आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२३मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताने अखेरची नाणेफेक जिंकली होती.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ४९.३ षटकांत सर्व बाद २६४ (स्टीव्ह स्मिथ ७३, ॲलेक्स कॅरी ६१; मोहम्मद शमी ३/४८, रवींद्र जडेजा २/४०) पराभूत वि. भारत : ४८.१ षटकांत ६ बाद २६७ (विराट कोहली ८४, श्रेयस अय्यर ४५, अक्षर पटेल ४२; नॅथन एलिस २/४९)
सामनावीर : विराट कोहली
भारतीय खेळाडूंची शिवलकर यांना आदरांजली
भारतीय संघातील खेळाडूंनी मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीसाठी दंडाभोवती काळ्या रंगाच्या फिती बांधल्या होत्या. मुंबईचे माजी रणजीपटू पद्माकर शिवलकर यांचे सोमवारी रात्री वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाल्याने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय संघाने या फिती बांधल्या. बीसीसीआयनेसुद्धा ट्वीट करत शिवलकर यांना आदरांजली वाहिली. डावखुरे फिरकीपटू शिवलकर यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून त्यांना ओळखले जायचे. क्रिकेट विश्वात शिवलकर हे ‘पॅडी’ नावाने लोकप्रिय होते. शिवलकर यांनी १९६१ ते १९८८ या काळात १२४ प्रथम श्रेणी सामन्यांत १९.६९च्या सरासरीने तब्बल ५८९ बळी मिळवले. वयाच्या २२व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या शिवलकर यांनी चक्क ४८व्या वर्षापर्यंत खेळण्याचा पराक्रम केला.