
लाहोर : उपांत्य लढतीपूर्वी दोन दिवसांमध्ये कराची ते दुबई आणि मग पुन्हा लाहोर असा प्रवास करण्याने नक्कीच आम्हाला मानसिक त्रास झाला. मात्र पराभवासाठी हे कारण देणे चुकीचे ठरेल. आम्ही गोलंदाजीत धावा रोखण्यासह फलंदाजांनी अधिक जबाबदारीने फलंदाजी करणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरने व्यक्त केली. त्याने आपल्या विधानाद्वारे एकप्रकारे आयसीसीच्या नियोजनावर निशाणा साधला आहे.
आफ्रिकेला बुधवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे अंतिम फेरी गाठण्यासह जेतेपदाचे स्वप्न भंगले. न्यूझीलंडने दिलेल्या ३६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने ५० षटकांत ९ बाद ३१२ धावांपर्यंत मजल मारली. मिलरने ६७ चेंडूंत नाबाद १०० धावांची दमदार खेळी साकारली. मात्र तरीही आफ्रिकेचे स्वप्न भंगले. आता रविवार, ९ मार्चला रंगणाऱ्या अंतिम फेरीत न्यूझीलंडची भारताशी गाठ पडणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार सर्व सामने दुबईत खेळत आहे. त्यामुळे भारताविरुद्ध खेळणाऱ्या प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाला दुबईत यावे लागले. आफ्रिकेवर मात्र भारताविरुद्ध न खेळूनही अवघ्या काही तासांसाठी दुबईत जाण्याची वेळ ओढवली. या प्रवासातील गोंधळाचा शरीरावर प्रभाव झाल्याचे मिलरचे मत आहे.
ब-गटात अग्रस्थान मिळवणाऱ्या आफ्रिकेने शनिवारी कराची येथे इंग्लंडविरुद्ध अखेरची साखळी लढत खेळली. त्या सामन्यातील विजयासह आफ्रिकेने गटात पहिले, तर ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान मिळवले. त्यानंतर रविवारी भारत-न्यूझीलंड यांच्यात अ-गटातील अखेरचा साखळी सामना होणार होता. यावरच ठरणार होते की दोन्ही संघ कोणत्या क्रमाने आगेकूच करतील व कोणता संघ भारताविरुद्ध दुबईतच उपांत्य सामना खेळणार. त्यामुळे आयसीसीने आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या संघांना अतिरिक्त दिवस मिळावा म्हणून रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत दुबईत आणले.
मात्र भारताने न्यूझीलंडला नमवून अ-गटात अग्रस्थान मिळवल्याने त्यांची ऑस्ट्रेलियासह उपांत्य फेरी पक्की झाली. अशा स्थितीत आफ्रिकेला सोमवारी सकाळी ७.३० वाजता पुन्हा एकदा लाहोरसाठी विमान पकडावे लागले. त्यांचा व न्यूझीलंडचा संघ सोमवारी ९.३० पर्यंत लाहोरला पोहोचला. म्हणजेच ३ दिवसांमध्ये आफ्रिकेने कराची ते दुबई आणि दुबई ते लाहोर असा प्रवास केला. प्रवासांतील अंतर विमानाने सव्वा ते दीड तासांचे होते. मात्र तरीही याचा शरीरावर तसेच मानसिकतेवर परिणाम झाल्याचे मिलरचे म्हणणे आहे.
“खरे सांगू तर हे सर्व त्रासदायक होते. आम्हाला ५ ते ६ तास प्रवास करायचा नव्हता. अवघा दीड ते २ तासांचाच प्रवास होता. आमच्याकडे विश्रांती घेत ताजेतवाने होण्यासाठी पुरेसा वेळ होता. मात्र रविवारी दुपारीच दुबईत पोहोचल्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा लाहोरसाठी निघणे योग्य नव्हते. आयसीसी स्पर्धेमध्ये असे होणे अपेक्षित नाही,” असे मिलर म्हणाला.
“मात्र यामुळे आमचा पराभव झाला, असे म्हणणार नाही. आम्ही मैदानात सुमार खेळ केला. विशेषत: न्यूझीलंडला आम्ही ३२५ धावांपर्यंत रोखणे अपेक्षित होते. तसेच फलंदाजीत आणखी मोठ्या भागीदाऱ्या वेगवान गतीने झाल्या असत्या, तर नक्कीच निकाल वेगळा असता,” असेही मिलरने आवर्जून सांगितले.
अंतिम फेरीसाठी न्यूझीलंडला पाठिंबा
अंतिम फेरीसाठी आपण न्यूझीलंडला पाठिंबा देत असल्याचे मिलरने सांगितले. त्याने भारताला पाठिंबा न देण्यामागील कारण स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र न्यूझीलंडने संपूर्ण स्पर्धेत केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच न्यूझीलंडमध्ये फिरकीला चांगले खेळणारे व परिस्थितीनुसार खेळ करणारे खेळाडू आहेत, असेही मिलरने नमूद केले. न्यूझीलंडच्या ३६३ धावांचा पाठलाग करताना मिलरच्या नाबाद शतकानंतरही आफ्रिकेला ३१२ धावांपर्यंत मजल मारता आली.