
लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत बुधवारी रंगणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेची न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. दोन्ही संघांमध्ये प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असल्याने कोण अंतिम फेरी गाठणार, हे पाहणे रंजक ठरेल. मात्र लाहोर येथील गदाफी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीवर २५ टक्के पावसाचे सावट आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन असल्याने पाऊस न आल्यास दोन्ही संघांकडून चौकार-षटकारांचा वर्षाव पाहायला मिळू शकतो.
टेम्बा बाव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने ब-गटात अग्रस्थान मिळवून आगेकूच केली. त्यांनी अफगाणिस्तान आणि इंग्लंड या संघांना धूळ चारली. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. गेल्या २-३ वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत आफ्रिकेने भरारी घेतली असून चोकर्सचा शिक्काही पुसून टाकला आहे. त्यामुळे आता १९९८ नंतर दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी आफ्रिकेचा संघ आतुर आहे.
इंग्लंडविरुद्ध दुखापतीमुळे मुकलेला टेम्बा संघात परतल्याने आफ्रिकेची फलंदाजी बळकट झाली आहे. तसेच एडीन मार्करम, वॅन डर दुसेन लयीत आहेत. हेनरिच क्लासेन आफ्रिकेचा ट्रम्प कार्ड ठरत असून त्याने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावून अन्य संघांना इशारा दिला आहे. डेव्हिड मिलरही फटकेबाजीत पटाईत आहे. मार्को यान्सेन, कगिसो रबाडा या वेगवान जोडीसह फिरकीपटू केशव महाराजवर आफ्रिकेची गोलंदाजी अवलंबून आहे.
दुसरीकडे मिचेल सँटनरच्या कर्णधारपदाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडने अ-गटातून दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. बांगलादेश व पाकिस्तानला हरवल्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडला नमवले. २०२३च्या टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र यंदा ते २००० नंतर दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी उत्सुक आहेत.
रचिन रवींद्र, टॉम लॅथम, केन विल्यम्सन यांच्यावर किवी संघाची फलंदाजी अवलंबून आहे. तसेच ग्लेन फिलिप्स व डॅरेल मिचेल मधल्या षटकांत योगदान देऊ शकतात. दोन्ही संघांतील क्षेत्ररक्षणही या लढतीत पाहण्याजोगे असेल. गोलंदाजीत मॅट हेन्री, विल ओरूर्क यांच्यावर किवी संघाची मदार आहे. फिरकीपटू सँटनर व मिचेल ब्रेसवेल यांच्यावर मधल्या षटकांची जबाबदारी आहे.
दरम्यान, या लढतीवर पावसाचे सावट असले तरी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. ९ मार्च रोजी अंतिम सामना दुबईत होणार आहे. राखीव दिवशीसुद्धा सुपर-ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लागला नाही, तर गटात अग्रस्थान मिळवल्याने आफ्रिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.