
दुबई : आम्ही या स्पर्धेत आतापर्यंत आपला सर्वोत्तम खेळ केलेला नाही, असे मला वाटते. अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंचा पुन्हा कस लागेल. तेथे आमची खरी चाचणी असेल, असे मत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४ गडी राखून पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने दिलेले २६५ धावांचे लक्ष्य भारताने ४९व्या षटकात गाठून सलग तिसऱ्यांदा आणि एकंदर पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत भारत अद्याप अपराजित असून त्यांना तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. रविवारी भारताची अंतिम फेरीत न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. मात्र प्रशिक्षक गंभीरच्या मते भारताने अद्याप सर्व आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ केलेला नाही.
“आम्ही या स्पर्धेत आतापर्यंत उत्तम खेळ केला. मात्र आपला सर्वोत्तम खेळ अद्याप शिल्लक आहे. संघातील सर्व खेळाडू पुढाकार घेत योगदान देत आहेत. अंतिम सामन्यापूर्वी हे चांगले लक्षण आहे. मात्र यावर समाधान मानून चालणार नाही. जिंकण्याची भूक अंतिम सामन्यातही कायम असणे गरजेचे आहे. विशेषत: प्रतिस्पर्धी संघ आणि त्या लढतीचे दडपण झेलण्याची क्षमता ज्या खेळाडूत असेल, तो नक्कीच चमकेल,” असे गंभीर म्हणाला.
“दुबईत आम्ही सराव करत नाही. आम्ही दुबईतील आयसीसीच्या अकादमीत सराव करतो. त्यामुळे मैदानातील खेळपट्टी कशी असेल, हे आम्हालासुद्धा माहीत नसते. दुबई हे आमचे घर नाही. त्यामुळे आम्हाला एकाच मैदानात सामने खेळण्यावरून जे कोणी आपले ज्ञान पाजळत आहेत, त्यांनी खरंच विचार करण्याची गरज आहे,” असेही गंभीरने सांगितले.
म्हणूनच पंतऐवजी राहुलला प्राधान्य!
राहुलची एकदिवसीय प्रकारात ५०च्या आसपास (४८.५३) सरासरी आहे. संघाच्या गरजेनुसार तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. संघाला सध्या निर्णायक क्षणी सामन्यात प्रभाव पाडणाऱ्या खेळाडूंची अधिक गरज आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला आवडेल, त्याच स्थानावर फलंदाजी करण्याची संधी मिळणार नाही. राहुल गेल्या २ वर्षांपासून एकदिवसीय प्रकारात प्रथम क्रमांकाचा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यामुळेच यावेळीही त्याला प्राधान्य देण्यात आले, असे सांगून गंभीरने ऋषभ पंतचे नाव न घेत राहुलला खेळवण्याचे कारण स्पष्ट केले.
विराटची आगेकूच, कुलदीपची घसरण
आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या जागतिक एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या शुभमन गिलने अग्रस्थान कायम राखले आहे. तसेच विराट कोहलीने एका स्थानाने कूच करताना चौथा क्रमांक मिळवला. गिलचे सध्या ७९१ गुण आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील पाकिस्तानच्या बाबर आझमचे ७७० गुण आहेत. आफ्रिकेचा हेनरिच क्लासेन तिसऱ्या स्थानावर आहे. विराट ७४७ गुणांसह चौथ्या, तर रोहित शर्मा ७४५ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित स्पर्धेपूर्वी तिसऱ्या स्थानी होता, मात्र त्याची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तसेच श्रेयस अय्यरने ७०२ गुणांसह आठवे स्थान मिळवले आहे. गोलंदाजांमध्ये फिरकीपटू कुलदीप यादवची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजा नवव्या स्थानी कायम आहे.
विराट, श्रेयस, शमीला नामांकन
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकनाची यादी आयसीसीने जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या तिघांना स्थान लाभले आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर व मोहम्मद शमी हे तीन भारतीय चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी, न्यूझीलंडचा टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, आफ्रिकेचा वॅन डर दुसेन, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन व अफगाणिस्तानचा अझमतुल्ला ओमरझाई यांनाही नामांकन लाभले आहे. चाहत्यांना आपले मत नोंदवण्यासाठी ३ दिवसांचा अवधी असून आयसीसीच्या संकेतस्थळावर चाहत्यांना मत नोंदवता येईल.