
रावळपिंडी : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी चाहत्यांना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रंगतदार लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी आपापली पहिली लढत जिंकली असल्याने सलग दुसऱ्या विजयासह ब-गटातून सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठण्याचा मान कोण मिळवणार, हे पाहणे रंजक ठरेल.
टेम्बा बाव्हुमाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आफ्रिकेने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा १०७ धावांनी धुव्वा उडवला. रायन रिकेलटनने शानदार शतक झळकावल्यावर वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनी उत्तम मारा केल्याने आफ्रिकेने वर्चस्व गाजवले. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील उपांत्य फेरीत आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाकडूनच पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यंदा हा संघ त्या पराभवाचा वचपा घेईल, अशी अपेक्षा आहे.
दुसरीकडे स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात खेळणारा ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडविरुद्ध ३५२ धावांचा यशस्वी पाठलाग करून अन्य संघाना इशारा दिला. आघाडीच्या वेगवान त्रिकुटाच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी काहीशी कमकुवत दिसत आहे. फलंदाजीत गेल्या लढतीतील शतकवीर जोश इंग्लिस पुन्हा छाप पाडण्यास आतुर आहे. स्मिथ, मार्नस लबूशेन व ट्रेव्हिस हेड यांच्याकडून कांगारूंना मोठी खेळी अपेक्षित आहे.
प्रतिस्पर्धी संघ
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, सीन ॲबट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लबूशेन, जेक फ्रेसर, बेन ड्वारशुईस, तन्वीर संघा.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बाव्हुमा (कर्णधार), रायन रिकेलटन, रासी वॅन डर दुसेन, एडन मार्करम, हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेझ शम्सी, टॉनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बोश, वियान मल्डर.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, स्पोर्ट्स १८ वाहिनी, जिओहॉटस्टार ॲप