अफगाणिस्तानचा इंग्लंडला दे धक्का; रोमहर्षक लढतीत ८ धावांनी सरशी, झादरानचे दीडशतक; रूटची शतकी खेळी व्यर्थ

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत बुधवारी शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या ब-गटातील थरारक लढतीत अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला.
अफगाणिस्तानचा इंग्लंडला दे धक्का; रोमहर्षक लढतीत ८ धावांनी सरशी, झादरानचे दीडशतक; रूटची शतकी खेळी व्यर्थ
Published on

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत बुधवारी शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या ब-गटातील थरारक लढतीत अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला. इब्राहिम झादरानने (१४६ चेंडूंत १७७ धावा) साकारलेल्या दीडशतकाला गोलंदाजांच्या कामगिरीची उत्तम साथ लाभल्याने अफगाणिस्तानने इंग्लंडवर ८ धावांनी सरशी साधली. त्यामुळे इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जो रूटची (१११ चेंडूंत १२० धावा) शतकी खेळी व्यर्थ ठरली.

गदाफी स्टेडियम, लाहोर येथे झालेल्या ब-गटातील या सामन्यात अफगाणिस्तानने दिलेल्या ३२६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४९.५ षटकांत ३१७ धावांत गारद झाला. अझमतुल्ला ओमरझाईने मार्क वूडला बाद करून अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातही अफगाणिस्तानने इंग्लंडला धक्का दिला होता. आता या विजयासह अफगाणिस्तानने ब-गटात दोन गुणांसह तिसरे स्थान मिळवले. त्यांची शुक्रवारी ऑस्ट्रेलियाशी अंतिम साखळी लढत होईल.

उभय संघांतील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ५० षटकांत ७ बाद ३२५ धावांचा डोंगर उभारला. झादरानने १२ चौकार व ६ षटकारांसह एकदिवसीय कारकीर्दीतील सहावे शतक झळकावले. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. त्याला ओमरझाई (४१), मोहम्मद नबी (४०), कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (४०) यांची उत्तम साथ लाभली. इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चरने ३ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना रूटने सहा वर्षांनी एकदिवसीय प्रकारात शतक झळकावले. त्याला जोस बटलर (३८), जेमी ओव्हर्टन (३२) यांनी उत्तम साथ दिली. मात्र ४६व्या षटकात ओमरझाईने रूटचा अडसर दूर केला. त्यानेच बटलर, फिल सॉल्ट, ओव्हर्टन यांनाही माघारी पाठवले. त्यामुळे अफगाणिस्तानने इंग्लंडला ३१७ धावांत गुंडाळून संस्मरणीय विजय नोंदवला. सॉल्ट, हॅरी ब्रूक (२५), जेमी स्मिथ (९) यांचे अपयश इंग्लंडला महागात पडले. तसेच १८ चेंडूंत २४ धावांची आवश्यकता असताना रूट बाद झाल्याने इंग्लंडचे स्वप्न भंगले. २०२३च्या विश्वचषकातही ते साखळीतच गारद झाले होते.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान : ५० षटकांत ७ बाद ३२५ (इब्राहिम झादरान १७७, अझमतुल्ला ओमरझाई ४१, मोहम्मद नबी ४०; जोफ्रा आर्चर ३/६४) विजयी वि. g इंग्लंड : ४९.५ षटकांत सर्व बाद ३१७ (जो रूट १२०, जोस बटलर ३८; ओमरझाई ५/५८)

सामनावीर : इब्राहिम झादरान

logo
marathi.freepressjournal.in