
दुबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारे भारतीय संघाचे शिलेदार गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अभियानाला प्रारंभ करतील. अ-गटात समावेश असलेल्या भारताची सलामीच्या लढतीत बांगलादेशशी गाठ पडणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होईल. साहजिकच या लढतीत प्रामुख्याने रोहित आणि विराट कोहली या अनुभवी फलंदाजांच्या जोडीवर चाहत्यांचे लक्ष असेल.
पाकिस्तान येथे ८ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ८ संघांचा समावेश असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात भारतीय संघ मात्र त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. २०१३नंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी आतुर असलेला भारत संघ बांगला टायगर्सची शिकार करण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडविरुद्ध नुकताच झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने ३-० असे निर्भेळ यश संपादन करून पूर्वपरीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले. मात्र आता दुबईतील संथ आणि फिरकीला पोषक खेळपट्टीवर भारतीय खेळाडूंचाही कस लागू शकतो. विशेषत: रोहित-विराट यांनी इंग्लंडविरुद्ध काहीशी लय मिळवली. त्यामुळे ते कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करतील. २०१८नंतर भारतीय संघ प्रथमच दुबईत एखादी एकदिवसीय लढत खेळणार आहे. त्यामुळे तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भारताच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.
दुसरीकडे नजमूल होसेन शांतो बांगलादेशचे नेतृत्व करणार असून या संघातही गुणवान खेळाडू आहेत. मात्र जागतिक स्पर्धांसाठी लागणारा अनुभव आणि कामगिरीतील सातत्य यामुळे बांगलादेशला अद्याप छाप पाडता आलेली नाही. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानेच बांगलादेशला उपांत्य फेरीत पराभूत केले होते. त्यामुळे बांगलादेश त्या पराभवाची परतफेड करण्यास आतुर असेल. दुबईतील खेळपट्ट्यांवर नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरत असल्याने दोन्ही संघ तसेच त्यांचे चाहते या बाबीवर लक्ष ठेवून असतील.
दरम्यान, पाकिस्तानमधील सुरक्षा आणि दोन्ही देशांमधील बिघडलेले राजकीय संबंध यामुळे भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. पीसीबी आणि बीसीसीआय यांनी आयसीसीशी केलेल्या करारानुसार आता पाकिस्तानमधील आयसीसी स्पर्धेसाठी भारतीय संघ तेथे जाणार नाही. तसेच भारतातील आयसीसी स्पर्धेसाठीही पाकिस्तानचा महिला अथवा पुरुष संघ आपल्या देशात येणार नाही. आयसीसीने व पीसीबीमध्ये झालेल्या करारानुसार भारतात होणाऱ्या २०२६चा टी-२० विश्वचषक व २०२५च्या महिलांच्या विश्वचषकात पाकिस्तानचे सामने अन्य देशात खेळवण्यात येणार आहेत.
फलंदाजांची फळी दमदार लयीत
इंग्लंडविरुद्ध मालिकावीर ठरलेला शुभमन गिल, रोहित, विराट आणि चौथ्या क्रमांकावर सातत्याने छाप पाडणारा श्रेयस अय्यर असे आघाडीचे चारही भारतीय फलंदाज सध्या उत्तम लयीत आहेत. रोहित-विराट यांच्या कारकीर्दीतील ही अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी ठरण्याची शक्यता आहे. तसेच हार्दिक पंड्या, अक्षर पटेल अष्टपैलू योगदान देण्यात पटाईत आहेत. यष्टीरक्षक म्हणून के. एल. राहुलला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे गंभीरने आधीच स्पष्ट केले. त्यामुळे ऋषभ पंतला प्रतीक्षा करावी लागू शकते.
वेगवान त्रिकुटावर नजरा; फिरकीपटू भारताची ताकद
बुमरा पाठदुखीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार असल्याने भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा कोण वाहणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग व हर्षित राणा असे तीन वेगवान गोलंदाज भारताच्या ताफ्यात आहेत. या तिघांपैकी दोघांनाच अंतिम ११ खेळाडूंत संधी मिळेल. त्याशिवाय हार्दिकही गोलंदाजी करेल. फिरकी गोलंदाजी भारतासाठी या स्पर्धेत निर्णायक ठरणार आहे. कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अक्षर, रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर असे पाच फिरकीपटू भारताकडे आहेत. त्यांच्यापैकी किमान ३ जण अंतिम संघात खेळतील, असे अपेक्षित आहे.
शांतो, रहिमवर बांगलादेशची भिस्त
बांगलादेशच्या संघाची फलंदाजीत शांतो, मुशफिकूर रहिम आणि महमदुल्ला रियाद यांच्यावर भिस्त असेल. शाकिब अल हसन व लिटन दास संघात नसल्याने बांगलादेशला फटका पडू शकतो. गोलंदाजीत मुस्तफिझूर रहमान आणि तस्किन अहमद यांची वेगवान जोडी त्यांच्यासाठी मोलाची ठरेल. भारताविरुद्ध नेहमीच चमकणारा मेहदी हसन फलंदाजी तसेच फिरकीद्वारे पुन्हा योगदान देण्यास आतुर असेल. स्पर्धेपूर्वी कर्णधार शांतोने ही स्पर्धा आम्ही जिंकण्यासाठीच खेळत आहोत, असे म्हटले होते. त्यामुळे मैदानात बांगलादेशचे खेळाडू कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरेल.
खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज
-भारताच्या सामन्यांसाठी दुबईत दोन खेळपट्ट्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या खेळपट्टीवर दुपारी वेगवान गोलंदाजांना आणि मधल्या षटकांत फिरकीपटूंना लाभ मिळतो. मात्र येथे सायंकाळी ७ ते ८च्या सुमारास मैदानात दव येऊ शकते. त्यामुळे धावांचा पाठलाग करणे काहीसे सोपे जाईल.
-दुबईतील तापमान गुरुवारी २५ ते ३० डिग्री सेल्सियस दरम्यान असेल. मात्र यादिवशी ५० टक्के पावसाची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-बांगलादेश आजवर फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. २०१७मध्ये झालेल्या त्या उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशला सहज धूळ चारली होती. मात्र एकदिवसीय लढतींचा विचार करता गेल्या ५ पैकी ३ सामन्यांत बांगलादेशने भारताला नमवले आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
बांगलादेश : नजमूल होसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तांझिद हसन, तौहिद हृदय, मुशफिकूर रहिम, रियाद महमदुल्ला, जेकर अली, मेहदी हसन, रिशाद होसैन, तस्किन अहमद, मुस्तफिझूर रहमान, परवेझ हौसेन, नसुम अहमद, तांझिम हसन, नाहिद राणा.
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओहॉटस्टार ॲप