Champions Trophy 2025 : यंग, लॅथमच्या शतकांचा पाकिस्तानला तडाखा; न्यूझीलंडची ६० धावांनी विजयी सलामी

टॉम लॅथम (१०४ चेंडूंत नाबाद ११८ धावा) आणि विल यंग (११३ चेंडूंत १०७ धावा) यांच्या शतकांचा बुधवारी पाकिस्तानला तडाखा बसला.
टॉम लॅथम (१०४ चेंडूंत नाबाद ११८ धावा) आणि विल यंग (११३ चेंडूंत १०७ धावा)
टॉम लॅथम (१०४ चेंडूंत नाबाद ११८ धावा) आणि विल यंग (११३ चेंडूंत १०७ धावा) @BLACKCAPS
Published on

कराची : टॉम लॅथम (१०४ चेंडूंत नाबाद ११८ धावा) आणि विल यंग (११३ चेंडूंत १०७ धावा) यांच्या शतकांचा बुधवारी पाकिस्तानला तडाखा बसला. त्यामुळे न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानला ६० धावांनी पराभूत केले. बाबर आझमची (९० चेंडूंत ६४) अर्धशतकी झुंज अपयशी ठरली.

कराची येथील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ५ बाद ३२० धावांपर्यंत मजल मारली. यंगने १२ चौकार व १ षटकारासह एकदिवसीय कारकीर्दीतील चौथे, तर लॅथमने १० चौकार व ३ षटकारांसह आठवे शतक साकारले. ३ बाद ७३ धावांवरून या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचली. यंग बाद झाल्यावर ग्लेन फिलिप्सने ३९ चेंडूंतच ६९ धावा फटकावताना ३ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे किवी संघाने तीनशे धावांचा पल्ला गाठला. पाकिस्तानकडून हॅरीस रौफ व नसीम शाह यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४७.२ षटकांत २६० धावांत गारद झाला. सौद शकील (६), मोहम्मद रिझवान (३), फखर झमान (२४), तय्यब ताहिर (१) यांनी निराशा केली. बाबरने ६ चौकारांसह एकदिवसीय कारकीर्दीतील ३५वे अर्धशतक साकारले. मात्र त्याने अनेक चेंडू निर्धावही खेळले. त्यामुळे धावगती वाढत गेली. खुशदील शाहने ४९ चेंडूंत ६९ धावा फटकावून सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र मिचेल सँटनरने बाबरचा, तर विल ओरूर्कने खुशदीलचा अडसर दूर करून पाकिस्तानचा पराभव पक्का केला. त्यामुळे यजमानांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. लॅथम सामनावीराचा मानकरी ठरला.

logo
marathi.freepressjournal.in