न्यूझीलंड तिसऱ्यांदा अंतिम फेरीत; रचिन, विल्यम्सन यांच्या शतकांमुळे दक्षिण आफ्रिकेवर ५० धावांनी मात

Champions Trophy 2025 : प्रतिभावान डावखुरा फलंदाज रचिन रवींद्र (१०१ चेंडूंत १०८ धावा) आणि अनुभवी केन विल्यम्सन (९४ चेंडूंत १०२ धावा) या दोघांनी बुधवारी शतकांचा सुरेख नजराणा सादर केला.
न्यूझीलंड तिसऱ्यांदा अंतिम फेरीत; रचिन, विल्यम्सन यांच्या शतकांमुळे दक्षिण आफ्रिकेवर ५० धावांनी मात
एक्स @ICC
Published on

लाहोर : प्रतिभावान डावखुरा फलंदाज रचिन रवींद्र (१०१ चेंडूंत १०८ धावा) आणि अनुभवी केन विल्यम्सन (९४ चेंडूंत १०२ धावा) या दोघांनी बुधवारी शतकांचा सुरेख नजराणा सादर केला. त्यांना कर्णधार व फिरकीपटू मिचेल सँटनरची (४३ धावांत ३ बळी) गोलंदाजीत सुरेख साथ लाभली. त्यामुळे न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ५० धावांनी मात केली. आता रविवारी रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्यात न्यूझीलंडसमोर भारताचे कडवे आव्हान असेल.

लाहोर येथील गदाफी स्टेडियमवर झालेल्या या उपांत्य लढतीत न्यूझीलंडने उभारलेल्या ३६३ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ ५० षटकांत ९ बाद ३१२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. डेव्हिड मिलरने ६७ चेंडूंत नाबाद १०० धावांची घणाघाती शतकी खेळी साकारून संघाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र आघाडीच्या फलंदाजांचे अपयश आफ्रिकेला महागात पडले. सँटनरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडने आता तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली आहे. १९९८मध्ये भारताला नमवून ही स्पर्धा त्यांनी जिंकली होती, तर २००९मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. आता रविवार, ९ मार्च रोजी दुबईत रंगणाऱ्या महाअंतिम सामन्यात भारत-न्यूझीलंड यांच्यात कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने धडाक्यात सुरुवात केली. ७ षटकांतच रचिन व विल यंग यांनी ४८ धावा फलकावर लावल्या. लुंगी एन्गिडीने यंगचा २१ धावांवर अडसर दूर केला. मात्र त्यानंतरही रचिन व विल्यम्सन यांनी आक्रमण सुरू ठेवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी रचली. रचिनने १३ चौकार व १ षटकारासह एकदिवसीय कारकीर्दीतील पाचवे, तर विल्यम्सनने १० चौकार व २ षटकारांसह १६वे शतक साकारले. तसेच रचिनचे हे या स्पर्धेतील दुसरे शतक ठरले. ३४व्या षटकात कगिसो रबाडाने रचिनला बाद करून ही जोडी फोडली.

त्यानंतर ४०व्या षटकात विल्यम्सनही माघारी परतला. मात्र डॅरेल मिचेल (३७ चेंडूंत ४९), ग्लेन फिलिप्स (२७ चेंडूंत नाबाद ४९) यांनी उपयुक्त योगदान दिल्यामुळे न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ३६२ धावांपर्यंत मजल मारली. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ही सर्वोत्तम सांघिक धावसंख्या ठरली. आफ्रिकेकडून एन्गिडीने तीन बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने रायन रिकेलटनला (१७) स्वस्तात गमावले. कर्णधार टेम्बा बाव्हुमा आणि वॅन डर दुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचली. मात्र त्यांना अपेक्षित धावगतीनुसार फटकेबाजी करता आली नाही. परिणामी बाव्हुमा ७१ चेंडूंत ५६ धावांवर सँटनरचा शिकार ठरला. सँटनरनेच मग दुसेनचाही ६६ चेंडूंत ६९ धावा केल्यावर त्रिफळा उडवला. धोकादायक हेनरिच क्लासेनला (३) बाद करून सँटनरने किवी संघाचा विजय जवळपास पक्का केला.

४ बाद १६७ अशी स्थिती असताना मैदानात आलेल्या मिलरने मात्र एकाकी झुंज दिली. त्याने १० चौकार व ४ षटकारांसह एकदिवसीय कारकीर्दीतील आठवे शतक झळकावले. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ लाभली नाही. एडीन मार्करम (३१), वियान मल्डर (८), मार्का यान्सेन (३) यांनी निराशा केली. परिणामी मिलरने शेवटच्या चेंडूवर शतक साकारूनही आफ्रिकेला ५० षटकांत ९ बाद ३१२ धावांपर्यंत पोहोचता आले. त्यामुळे निर्णायक लढतीत कच खाल्ल्याने त्यांच्यावर पुन्हा एकदा चोकर्सचा शिक्का बसला.

न्यूझीलंडने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. यापूर्वी १९९८मध्ये त्यांनी भारताला अंतिम फेरीत धूळ चारली होती, तर २००९मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत नमवले.

रचिन रवींद्रने या स्पर्धेतील दुसरे शतक साकारले. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रचिन आता २२६ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. बेन डकेट २२७ धावांसह अग्रस्थानी आहे.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड : ५० षटकांत ६ बाद ३६२ (रचिन रवींद्र १०८, केन विल्यम्सन १०२, डॅरेल मिचेल ४९, ग्लेन फिलिप्स नाबाद ४९; लुंगी एन्गिडी ३/७२) विजयी वि.

दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ९ बाद ३१२ (डेव्हिड मिलर नाबाद १००, वॅन डर दुसेन ५९, टेम्बा बाव्हुमा ५६; मिचेल सँटनर ३/४३)

सामनावीर : रचिन रवींद्र

logo
marathi.freepressjournal.in