
रावळपिंडी : रचिन रवींद्रने (१०५ चेंडूंत ११२ धावा) पुनरागमनात साकारलेल्या धडाकेबाज शतकाला फिरकीपटू मिचेल ब्रेसवेलच्या (२६ धावांत ४ बळी) प्रभावी गोलंदाजीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे न्यूझीलंडने सोमवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला () गडी आणि () चेंडू राखून धूळ चारली. सलग दुसऱ्या विजयासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले, तर बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले.
रावळपिंडी स्टेडियमवर झालेल्या अ-गटातील या लढतीत न्यूझीलंडने बांगलादेशला ५० षटकांत ९ बाद २३६ धावांत रोखले. त्यानंतर डोक्याला झालेल्या दुखापतीतून सावरत संघात परतलेल्या डावखुऱ्या रचिनने चौथे एकदिवसीय शतक झळकावताना १२ चौकार व १ षटकार लगावला. त्याला टॉम लॅथमच्या (५५) अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. ३ बाद ७२ धावांवरून लॅथम व रवींद्रने चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी रचली. रवींद्र बाद झाल्यावर ग्लेन फिलिप्स (नाबाद २१) व ब्रेसवेल (नाबाद ११) यांनी ४६.१ षटकांत न्यूझीलंडचा विजय साकारला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना कर्णधार नजमूल शांतोने ७७, तर जेकर अलीने ४५ धावा करत बांगलादेशला २३६ धावांपर्यंत नेले. ब्रेसवेलने मुशफिकूर रहिम (२), महमदुल्ला (४), तांझिद हसन (२४) असे महत्त्वाचे बळी मिळवले. ब्रेसवेललाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आता २ मार्चला न्यूझीलंडची भारताशी गाठ पडणार आहे. या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. तर बांगलादेश व पाकिस्तान यांचे आव्हान संपुष्टात आले.