रोहित, शमी यांना किवींविरुद्ध विश्रांती? जोखीम न पत्करण्याचा व्यवस्थापनाचा इरादा

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारताची न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मा व मोहम्मद शमी या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
रोहित, शमी यांना किवींविरुद्ध विश्रांती? जोखीम न पत्करण्याचा व्यवस्थापनाचा इरादा
Published on

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारताची न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मा व मोहम्मद शमी या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.

रोहितच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने अ-गटात सलग दोन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली. त्यानंतर पाकिस्तानवर वर्चस्व गाजवून भारताने आगेकूच केली. त्यामुळे आता २ मार्चला भारत-न्यूझीलंड लढतीमध्ये भारतीय संघात काही बदल अपेक्षित आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत गोलंदाजी करताना शमीच्या पायाला दुखापत झाली होती. तर दुसरीकडे रोहितला बाबर आझमच्या विकेटचे सेलिब्रेशन करताना स्नायू ताणले गेल्यामुळे काही काळ मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे आता या दोघांना न्यूझीलंडविरुद्ध विश्रांती देण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत असल्याचे समजते. कारण ४ मार्चला दुबईतच भारताला उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे.

रोहितला विश्रांती दिल्यास शुभमन गिल भारताचे नेतृत्व करेल. तसेच फलंदाजीत भारताला वॉशिंग्टन सुंदर किंवा ऋषभ पंतला खेळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र फलंदाजीत सलामीला के. एल. राहुलला बढती मिळू शकते. शमीच्या जागी अर्शदीप सिंगला पहिला सामना खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. शमीने बांगलादेशविरुद्ध ५ बळी घेतले होते. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत त्याच्यावर वेगवान गोलंदाजीची भिस्त आहे. वरुण चक्रवर्तीलाही संधी मिळू शकते.

बुमराचा गोलंदाजीच्या सरावाला प्रारंभ

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सरावाला प्रारंभ सुरू केला आहे. एनसीएने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बुमरा गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असे सांगितले होते. मात्र निवड समितीने जोखीम न पत्करता बुमराला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ खेळाडूंच्या संघात स्थान दिले नाही. बुमरा उपांत्य फेरीसाठी थेट संघात परतू शकला असता. मात्र आता थेट आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल.

logo
marathi.freepressjournal.in